
डोंबिवली, 17 एप्रिल (हिं.स.) : बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७११, पंचशील सामाजिक संस्था आणि पंचशील महिला मंडळ, लोढा हेवन (निळजे) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संयुक्त जयंती महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. १४ ते १६ एप्रिल दरम्यान पार पडलेल्या या तीन दिवसीय महोत्सवात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवात सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकत्रित अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांचे लोढा हेवन येथे प्रथम आगमन. त्यांच्या स्वागतासाठी आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता, तसेच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
सभेत बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. आंबेडकरी समाजाला योग्य दिशा देण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी नेतृत्व आणि संघटन कौशल्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य करत त्यांनी इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावावरही आपले मत व्यक्त केले. याशिवाय, वरळी येथील भीम जयंतीला विरोध करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली.
कार्यक्रमाला समाजभूषण भगवान साळवी, अनंत पारदुले (अध्यक्ष, रिपब्लिकन सेना कल्याण-डोंबिवली ग्रामीण), समाधान वानखडे (सचिव) आणि आनंद मोहन यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थित पाहुण्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.--------------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi