कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची विक्रमी भरारी; 437 कोटींचा महसूल जमा
ठाणे, 17 एप्रिल, (हिं.स.)। प्रशासकीय शिस्त आणि कामातील नियोजनाच्या जोरावर कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. या कार्यालयाने वर्षभरात तब्बल ४३७ कोटी ८० लाख रुपयांचा विक्रमी महसूल सरकारी तिज
कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची विक्रमी भरारी; 437 कोटींचा महसूल जमा


ठाणे, 17 एप्रिल, (हिं.स.)। प्रशासकीय शिस्त आणि कामातील नियोजनाच्या जोरावर कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. या कार्यालयाने वर्षभरात तब्बल ४३७ कोटी ८० लाख रुपयांचा विक्रमी महसूल सरकारी तिजोरीत जमा केला असून, परिवहन विभागाच्या वर्तुळात या यशाचे मोठे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे शासनाकडून देण्यात आलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट या कार्यालयाने १०० टक्क्यांहून अधिक पूर्ण केले असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. आशुतोष बारकुल यांनी दिली आहे.

या महसूल वाढीमध्ये वाहन नोंदणीचा वाटा सर्वाधिक राहिला आहे. वर्षभरात या कार्यालयांतर्गत एकूण १,०८,१२५ नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली. यात दुचाकी वाहनांची संख्या ७९,५५७ इतकी असून, १६,८२६ चारचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे. यासोबतच ३,५७१ रिक्षा, ४,२९२ मालवाहू वाहने आणि मोठ्या प्रमाणात प्रवासी व इतर वाहनांची नोंदणी झाल्याने महसुलाचा आकडा वाढण्यास मोठी मदत झाली.

गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी झालेली वाढ अत्यंत लक्षणीय मानली जात आहे. मागील वर्षी याच कार्यालयाने ३७२ कोटी २२ लाख रुपयांचा महसूल गोळा केला होता, त्या तुलनेत यंदा तब्बल ६५ कोटी रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. हे यश केवळ आकडेवारीपुरते मर्यादित नसून, कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेला समन्वय आणि केलेल्या कठोर मेहनतीचे हे फलित असल्याचे बोलले जात आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे कल्याण आरटीओ कार्यालयाचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande