
परभणी, 17 एप्रिल (हिं.स.)। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत पारस - गैगाव - अकोला या मार्गावर अप व डाऊन दोन्ही मार्गांवर स्वयंचलित ब्लॉक प्रणाली बसविण्याचे काम हाती घेण्यात आले असून या पायाभूत कामांमुळे भुसावळ - बडनेरा विभागातील काही गाड्यांचे तात्पुरते नियमन करण्यात येणार आहे. या कामांच्या पार्श्वभूमीवर काही गाड्या विलंबाने धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
23 एप्रिल 2026 रोजी सुटणारी गाडी क्र. 12485 नांदेड - श्रीगंगानगर एक्सप्रेस ही काटेपुर्णा - शेगाव दरम्यान सुमारे दोन तास विलंबाने धावणार आहे. त्याचप्रमाणे 23 एप्रिल रोजी सुटणारी गाडी क्र. 22723 नांदेड - श्रीगंगानगर एक्सप्रेस ही अकोला येथे क्रॉसिंगमुळे सुमारे 30 मिनिटे उशिराने धावेल. तसेच 22 एप्रिल रोजी सुटणारी गाडी क्र. 17605 काचीगुडा - भगत की कोठी एक्सप्रेस आणि गाडी क्र. 12719 जयपूर - हैदराबाद एक्सप्रेस या दोन्ही गाड्या अकोला येथे क्रॉसिंगमुळे सुमारे 30 मिनिटे विलंबाने धावणार आहेत. या तात्पुरत्या बदलांची नोंद घेऊन प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis