
रायगड, 17 एप्रिल (हिं.स.)। नेरळ पश्चिम येथील मोहोसिन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादितमधील कथित गैरव्यवहारांचा भंडाफोड करत रहिवासी सदस्य संदेश जयवंत साळुंके यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. येत्या २९ एप्रिल २०२६ पासून कर्जत येथील सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
साळुंके यांनी सादर केलेल्या निवेदनात संस्थेच्या कारभारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. “संस्थेत अनेक वर्षांपासून नियमांचा भंग सुरू असून सदस्यांची उघडपणे फसवणूक केली जात आहे. मात्र प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.
निवेदनानुसार, संस्थेची अधिकृत सदस्य नोंदणी अपूर्ण ठेवण्यात आली असून अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव जागा मुद्दाम रिक्त ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. कन्व्हेअन्स डीडच्या नावाखाली सदस्यांकडून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करण्यात आला, मात्र त्याचा कोणताही हिशोब देण्यात आलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे मागील पाच वर्षांत एकदाही सर्वसाधारण सभा घेण्यात आलेली नसून आर्थिक व्यवहारांबाबत पारदर्शकता ठेवण्यात आलेली नाही.
“हा केवळ गैरव्यवहार नसून सहकार कायद्याचा उघड भंग आहे,” असे नमूद करत साळुंके यांनी प्रशासनावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. “आता थेट लढा!” प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न केल्यास २९ एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. “या आंदोलनादरम्यान काहीही घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, या निवेदनाच्या प्रती विभागीय सह निबंधक, कोकण विभाग, मुंबई, कर्जत व नेरळ पोलीस ठाणे, तहसीलदार कर्जत, तसेच जिल्हाधिकारी रायगड यांना देण्यात आल्या आहेत.
आता या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते, की आंदोलन अधिक तीव्र होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)