
अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.)
चांदूरबाजार तालुक्यातील सुमारे ३० हजार लोकसंख्या असलेल्या शिरजगावकसबा येथील बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना दररोज मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. लाखो रुपये खर्च करून उभारलेले बसस्थानक आज घाणीच्या विळख्यात सापडले असून मूलभूत सुविधांचाही पूर्णतः अभाव आहे. परतवाडा, चांदूरबाजार व मोर्शी डेपोमधून दररोज शेकडो प्रवासी याठिकाणावरून प्रवास करतात. तसेच पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी हे केंद्रबिंदू आहे. मात्र बसण्याची सोय नसणे, स्वच्छतेचा अभाव, तुटलेली दारे-खिडक्या, बंद पडलेला नियंत्रण कक्ष यामुळे बसस्थानक वापरण्यायोग्यच राहिलेले नाही. परिणामी बसचालक केवळ वळणासाठी बसस्थानकाचा वापर करीत असून प्रवाशांना मुख्य रस्त्यावर जीव धोक्यात घालून बसमध्ये चढ-उतार करावा लागत आहे. प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी व वीजपुरवठा नसल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अंधाराचा फायदा घेत डिझेल चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे रात्री मुक्कामी असणाऱ्या बसेस पोलिस ठाण्यासमोर उभ्या कराव्या लागत आहेत. बसस्थानक परिसरात अतिक्रमण वाढले असून शेणाचे ढिगारे, गुरेढोरे व खासगी वाहने उभी केली जात असल्यामुळे परिसर अस्वच्छ झाला आहे. शिरजगावकसबा हे कार्तिक उत्सवासाठी प्रसिद्ध असून आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांतून तीर्थक्षेत्र ‘ब’ दर्जा मिळाला आहे. त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या निधीतून बसस्थानकाचे सुशोभीकरण व सुधारणा करावी, अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाचे प्रशासक प्रवीण खेरडे यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी