
गुणवत्तेत तडजोड न करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
लातूर, 17 एप्रिल (हिं.स.) : शासकीय विश्रामगृह, लातूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७५ फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ उभारणी संदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पाला गती देण्याचे तसेच कामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये, याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, पुढील टप्प्यात अधिक निधीची आवश्यकता भासल्यास स्वतः पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. हा प्रकल्प केवळ स्मारक नसून ज्ञान, समानता आणि प्रेरणेचे प्रतीक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शिल्पाची गुणवत्ता, सूक्ष्म बारकावे आणि भव्यता यांचा समन्वय साधत लातूरच्या गौरवात भर घालणारे हे स्मारक उभे राहावे, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही पालकमंत्री भोसले यांनी दिले.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis