
सोलापूर, 17 एप्रिल (हिं.स.)।
जिल्ह्यात 17 धर्मादाय रुग्णालय कार्यरत आहेत. या सर्व रुग्णालयांनी शासन निर्देशानुसार सर्वसामान्य, गरजू व गोरगरीब रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे अनिवार्य असल्याचे धर्मादाय उप आयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी निर्देशित केले आहे. नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय समितीच्या त्रैमासिक आढावा बैठकीत समितीचे सचिव धर्मादाय उप आयुक्त ईश्वर सूर्यवंशी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण गुंजाळ, धर्मादाय निरीक्षक उमेश देशमुख, भागवत फुलसुंदर यांच्यासह समिती सदस्य व धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
धर्मदाय उप आयुक्त श्री सूर्यवंशी पुढे म्हणाले की राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व 17 धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या गोरगरीब गरजू रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधेसह त्यांना व्यवस्थित माहिती देणे आवश्यक आहे. तसेच ज्या कारणासाठी शासनाने रुग्णालयांना मान्यता दिलेली आहे त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी प्रत्येक रुग्णालयांनी करणे आवश्यक आहे. तसेच ज्या कारणासाठी त्यांना शासकीय जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्या जागेचा वापर वैद्यकीय सेवा देण्यासाठीच करावा अन्य व्यावसायिक कारणासाठी याचा वापर केला जाणार नाही याबाबतची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सुचित केले.
धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्याकडील आरोग्य सेवकांना योग्य प्रशिक्षण द्यावे. त्याप्रमाणेच शासनाच्या वतीने नियुक्ती केलेल्या पाच आरोग्य सेवकांनाही ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आलेले आहे तरी संबंधित रुग्णालयाने ह त्यांना फील वरील प्रशिक्षण द्यावे. आरोग्य सेवक व रुग्णालय यांच्यात चांगला समन्वय असला पाहिजे तसेच आरोग्य सेवकांनी रुग्णालयात येणाऱ्या गरजू रुग्णांना उपचाराच्या अनुषंगाने तसेच त्यांनी विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित सांगावी व योजनेचा क्लेम ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रासह अद्यावत तयार करून द्यावा. संबंधित रुग्णालय योजनेत असलेल्या रुग्णाकडून अतिरिक्त पैसे घेणार नाहीत याची काळजी घ्यावी असे निर्देश श्री. सूर्यवंशी यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड