
लातूर, 18 एप्रिल (हिं.स.) : लातूर येथील जुन्या एमआयडीसी परिसरातील मुंदडा इंडस्ट्रीजमध्ये लागलेल्या भीषण आगीतील मृत कामगाराच्या कुटुंबाला न्याय मिळावा, तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, या मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दोन स्वतंत्र निवेदने देण्यात आली.
पहिल्या निवेदनात, मुंदडा इंडस्ट्रीजमधील आगीत एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची आणि अनेक जण जखमी झाल्याची बाब अधोरेखित करण्यात आली. मृत कामगाराच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह लक्षात घेऊन त्यांना तातडीने भरघोस आर्थिक मदत द्यावी, तसेच जखमींना आवश्यक वैद्यकीय सहाय्य पुरवावे, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय, संबंधित कारखान्यात मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा अवैध साठा आढळल्याचा आरोप करत, या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख बालाजी (भाऊ) रेड्डी यांनी केली.
दुसऱ्या निवेदनात, एका शाळेमध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींमार्फत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला जात असल्याचा प्रकार समाजमाध्यमांद्वारे समोर आल्याचा उल्लेख करण्यात आला. दोन दिवस उलटूनही प्रशासनाने याची दखल न घेतल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर संबंधित शाळेची मान्यता रद्द करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाप्रमुख बालाजी (भाऊ) रेड्डी, संपर्कप्रमुख चंद्रनाथ मुरळीकर, युवा सेना जिल्हाप्रमुख राहुल मातोडकर, तालुकाप्रमुख शंकर रांजणकर, भागवत वांगे, तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis