काँग्रेसचा सुधारणांना कायमच विरोध असतो - पंतप्रधान
भविष्यात महिलांना आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत नवी दिल्ली, १८ एप्रिल (हिं.स.) : काँग्रेस पक्ष नेहमीच सुधारणांच्या आड आलेला आहे. आज आमच्याकडे बहुमत नव्हते. परंतु आम्ही अजूनही हार मानलेली नाही. भविष्यात महिलांना आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्
पंतप्रधान मोदी


भविष्यात महिलांना आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत

नवी दिल्ली, १८ एप्रिल (हिं.स.) : काँग्रेस पक्ष नेहमीच सुधारणांच्या आड आलेला आहे. आज आमच्याकडे बहुमत नव्हते. परंतु आम्ही अजूनही हार मानलेली नाही. भविष्यात महिलांना आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. याआधीही काँग्रेसने सीएए, एनआरसी कायद्याला विरोध केलेला आहे. काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांनी डिजिटल पेमेंटलाही विरोध केला होता. काँग्रेसने कलम 370 हटवण्यालाही विरोध केला होता, असा हल्लाबोल देखील मोदींनी केला. संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियम दुरुस्ती विधेयक नामंजूर झाले. सरकारला दोन तृतीयांश मतदान मिळू शकले नाही. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आज, शनिवारी देशवासीयांशी संवाद साधताना बोलत होते.

याप्रसंगी मोदी म्हणाले की, आम्हाला देशातील महिलांचा पाठिंबा आहे. महिला आरक्षणाच्या आड येणाऱ्या प्रत्येक संकटाला आम्ही बाजूला करू. आमचा विश्वास, हिंमत अजूनही कमी झालेली नाही. महिला आरक्षणाचा विरोध करणारे पक्ष संसद आणि विधानसभेत महिलांची प्रतिनिधित्त्व वाढवण्याला कधीच रोखू शकत नाहीत. तसेच, महिला आरक्षण लागू करण्यासाठी फक्त योग्य वेळेची प्रतीक्षा आहे. महिलांच्या आरक्षणाबाबत भाजपा आणि एनडीएचा निश्चय अढळ आहे. काल आमच्याकडे बहुमत नव्हते. परंतु आम्ही पराभूत झालो, असा त्याचा अर्थ होत नाही. आमचा आत्मविश्वास अजेय आहे. आमचा प्रयत्न चालूच राहील. भविष्यात आम्हाला संधी मिळेल. देशातील अर्ध्या लोकसंख्येच्या स्वप्नासाठी, देशाच्या भविष्यासाठी आम्ही आमचा संकल्प पूर्ण करून दाखवू, असा निर्धारच पंतप्रधान मोदींनी बोलून दाखवला.

महिला आरक्षणातून महिलांना संधी देण्यासाठी अनेक दशकांपासून लढाई सुरू आहे. इतक्या महिला माझ्यासमोर अडचणी मांडत आहे, पत्र पाठवत आहे. आज तुम्ही सगळे दु:खी आहात, मी सुद्धा तुमच्या दु:खामध्ये सामील आहे. आज विधेयक मंजूर झालं नाही, आमच्याकडे संख्याबळ मिळालं नाही. पण मला माहिती आहे, देशातली १०० टके महिलांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे, महिलांच्या आरक्षणात येणाऱ्या प्रत्येक अडचणीचा खात्मा करून राहू, आमची हिंमत अतूट आहे, आमचे ध्येय स्पष्ट आहे. महिला आरक्षणाला विरोध करणारे पक्ष आणि त्यांची भागीदारी वाढवण्यात कधी यशस्वी होणार नाही. फक्त वेळ महत्त्वाची आहे. एनडीएचं हे स्वप्न आहे, आमच्याकडे संख्याबळ नव्हतं म्हणून आम्ही हरलो नाही, आमचे प्रयत्न संपणार नाही, आमचे प्रयत्न थांबणार नाही. आमच्याकडे पुढेही पर्याय आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मतदारसंघांची पुनर्रचना केल्यावर दक्षिणेकडील राज्यांना फटका बसणार आहे, असा दावा विरोधकांकडून केला जात होता. हा दावा देखील मोदी यांनी यावेळी फेटाळून लावला. हे विधेयक मंजूर झाले असते तर मी त्याचे श्रेय विरोधकांना देण्यास तयार होतो असे त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande