तेलंगणा : के. कविता यांनी ‘तेलंगणा राष्ट्र सेना’ या नव्या राजकीय पक्षाची केली घोषणा
हैदराबाद, 25 एप्रिल (हिं.स.)। तेलंगणाच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली असून के. कविता यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. तेलंगणा राष्ट्र सेना (टीआरएस) असे या पक्षाचे नाव ठेवण्यात आले असून, भारत राष्ट्र समिति (बीआरएस) पासून विभक्त झाल्यानंत
Telangana K. Kavitha Announces New Political Party


हैदराबाद, 25 एप्रिल (हिं.स.)। तेलंगणाच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली असून के. कविता यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. तेलंगणा राष्ट्र सेना (टीआरएस) असे या पक्षाचे नाव ठेवण्यात आले असून, भारत राष्ट्र समिति (बीआरएस) पासून विभक्त झाल्यानंतर जवळपास सात महिन्यांनी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात त्यांनी पक्षाची अधिकृत घोषणा करत तेलंगणाच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला.

या घोषणेला विशेष महत्त्व यासाठीही आहे की, कविता यांचे वडील आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पूर्वी ‘तेलंगणा राष्ट्र समिती’ (टीआरएस) या नावाने पक्षाची स्थापना केली होती. पुढे त्याच पक्षाचे नाव बदलून ‘भारत राष्ट्र समिति’ (बीआरएस) असे करण्यात आले. आता पुन्हा ‘टीआरएस’ या नावाचा वापर करत कविता यांनी स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

पक्षाच्या घोषणेपूर्वी कविता यांनी हैदराबादमधील अमरवीरुला स्तूपम येथे जाऊन 1969 च्या तेलंगणा आंदोलनात प्राण गमावलेल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. या कृतीतून त्यांनी आपल्या नव्या पक्षाचा केंद्रबिंदू तेलंगणाच्या अस्मिता, हक्क आणि अपूर्ण राहिलेल्या प्रश्नांवर असणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, तेलंगणाच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि राज्याच्या अपूर्ण अजेंड्यावर काम करण्यासाठी नव्या प्रादेशिक पक्षाची गरज आहे.

माध्यमांशी संवाद साधताना कविता यांनी स्पष्ट केले की त्यांनी बीआरएस पक्ष स्वेच्छेने सोडलेला नाही, तर त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना पक्षातून बाहेर काढण्यात आले. त्यांनी आरोप केला की, बीआरएस पक्षाने आपल्या मूळ उद्दिष्टांपासून दूर जात नाव, काम आणि विचारसरणीत बदल केला, ज्यामुळे जनतेशी असलेले नाते कमकुवत झाले. त्यांच्या मते, कोणताही पक्ष जर आपल्या मूलभूत विचारांपासून भरकटला, तर तो दीर्घकाळ टिकू शकत नाही.

कविता यांनी भावनिक शब्दांत सांगितले की, “मी तेलंगणाची मुलगी आहे. माझ्या रक्तात तेलंगणाचा जाज्वल्य आत्मा आहे. आम्ही आमच्या ध्येयासाठी हट्टी आहोत आणि पूर्णपणे समर्पित आहोत.” त्यांनी पुढे नमूद केले की, गेल्या वीस वर्षांत त्यांनी तेलंगणा आंदोलनासाठी आयुष्य घालवले असून, राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्या कोणतीही तडजोड करणार नाहीत. त्यांनी असेही म्हटले की, “पक्ष आमच्यासोबत असो वा नसो, कुटुंब सोबत असो वा नसो, तेलंगणाची जनता हाच माझा खरा परिवार आहे.”

बीआरएस पक्षासोबतचा त्यांचा संघर्ष मागील वर्षी उघड झाला होता. सप्टेंबर 2025 मध्ये त्यांना कथित पक्षविरोधी कारवायांमुळे निलंबित करण्यात आले होते. टी. हरीश राव आणि जे. संतोष राव यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यांनंतर ही कारवाई करण्यात आली होती. निलंबनानंतर कविता यांनी या दोन्ही नेत्यांवर गंभीर आरोप करत त्यांच्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासोबत संगनमत करून त्यांच्या कुटुंब आणि पक्षाला कमजोर करण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता.या वादानंतर कविता यांनी आपल्या एमएलसी पदाचा राजीनामा दिला आणि नंतर ‘तेलंगणा जागृती’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय पातळीवर काम सुरू ठेवले. आता नव्या पक्षाच्या स्थापनेद्वारे त्यांनी पुन्हा सक्रिय राजकारणात मोठी एन्ट्री केली आहे.

कविता यांच्या या निर्णयामुळे तेलंगणाच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्या नव्या पक्षामुळे बीआरएसला थेट आव्हान निर्माण होण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकांमध्ये मतविभाजन होण्याचीही चर्चा रंगू लागली आहे. तेलंगणातील प्रादेशिक राजकारण अधिक चुरशीचे होण्याचे संकेत या घडामोडीतून स्पष्ट दिसत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande