

* अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक-यांच्या बांधावर
* नुकसानाचे पंचनामे करून बाधित शेतक-यांना तातडीने मदत दिली जाईल : दत्तात्रय भरणे
पुणे, 02 एप्रिल (हिं.स.) - राज्यात वादळी वारा व गारांच्या पावसामुळे (अवकाळी) १ लाख २२ हजार हेक्टरहून ( ३ लाख ५ हजार एकर) अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यभरातील नुकसानीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन तातडीने पंचनामे पूर्ण करुन बाधित शेतक-यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गावातील नुकसान झालेल्या आंब्याच्या बागांचे तसेच विविध शेती पिकांचे प्रत्यक्ष पाहणी केली. अवकाळी पावसामुळे आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी निदर्शनास आले. अनेक ठिकाणी फळगळ, झाडांचे नुकसान तसेच उभ्या पिकांवर परिणाम झाल्याचे दिसून आले. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यभर मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः नाशिक (२९,८१२ हेक्टर), अहिल्यानगर (२३,६३३ हेक्टर), जळगाव (२२,३६१ हेक्टर), धुळे (१४,८३२ हेक्टर), बुलढाणा (८,५०७ हेक्टर) व छत्रपती संभाजीनगर (८,४४५ हेक्टर) आदी जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
राज्यात केळी, गहू, मका, हरभरा, आंबा, ज्वारी, टरबूज, कलिंगड, भाजीपाला, डाळिंब, कांदा, संत्रा, द्राक्ष आदी पिकांचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक ठिकाणी कांदा कुजला असून पपईची रोपेही खराब झाली आहेत. शेतात पाणी साचल्याने उभी पिके आडवी झाली असून मजुरी व खतांचा खर्च वाया गेला आहे.
यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, “अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, अशी सर्व बांधवांना विनंती आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी