
भवानीपूर, 02 एप्रिल (हिं.स.) : मतदानाच्या माध्यमातून तृणमूल काँग्रेसला (टीएमसी) मुळासकट उखडून बंगालच्या उपसागरात फेकण्यासाठी प्रत्येकाने निर्भय होऊन मतदान करणे आवश्यक आहे. मी पुढील 15 दिवस पश्चिम बंगालमध्येच मुक्की राहणार असून मतदारांना कोणतेही गुंड रोखू शकत नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. राज्यातील भवानीपूर येथे आयोजित पदयात्रेनंतर ते बोलत होते.
गृहमंत्री अमित शाह यांचा ताफा जेव्हा ममता बॅनर्जींचे निवासस्थान असलेल्या कालीघाट परिसरात पोहचताच टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी जय बांगला व ममता बॅनर्जी अमर रहे अशा घोषणा दिल्या. डोक्यावर काळे कापड बांधलेल्या काही व्यक्तींनी अमित शाह, परत जा अशा घोषणा दिल्या, तसेच त्यांनी काळे झेंडेही फडकवले. त्यानंतर, टीएमसी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स उभारले आणि जमावाला नियंत्रित केले. यापूर्वी, कोलकाता येथे एका सभेला संबोधित करताना शाह यांनी म्हटले होते की, सुवेंदू अधिकारी यांना नंदीग्राममधून निवडणूक लढवायची होती; परंतु मी त्यांना सांगितले की, आपल्याला ममता बॅनर्जी यांचा पराभव केवळ नंदीग्राममध्येच नव्हे, तर थेट त्यांच्याच बालेकिल्ल्यात करणे गरजेचे आहे.
पश्चिम बंगालमधील जनतेला महिलांच्या असुरक्षिततेचा त्रास होत असून टीएमसीच्या गुंडांमुळे त्रस्त आहेत, घुसखोरांमुळे बदलणाऱ्या डेमोग्राफी परिवर्तनामुळे त्रस्त आहेत आणि राज्यात होत असलेल्या भ्रष्टाचारामुळेही त्रस्त आहेत. जनता मागणी करत आहे की आता बंगालमध्ये बदल व्हायला हवा. पश्चिम बंगालची सीमा पूर्णपणे सील करून घुसखोरांना एक-एक करून देशाबाहेर हाकलून द्यायचे आहे आणि रविंद्रनाथ टॅगोरांच्या स्वप्नातील ‘सोनार बांग्ला’ उभारायचा आहे असा शाह म्हणाले. भवानीपूर येथील जनतेने जर एकच जागा जिंकून दिली, तर बदल आपोआप घडेल. सुवेंदू अधिकारी यांना नंदीग्राममधून निवडणूक लढवायची होती, पण मी त्यांना सांगितले की ममतांच्या गडात जाऊन त्यांना पराभूत करा. यावेळी ममता बंगालमध्येही पराभूत होतील आणि भवानीपूरमध्येही पराभूत होतील असे शाह म्हणाले.
भाजप कार्यकर्त्यांची हत्या करणाऱ्यांना तुरुंगात टाकले पाहिजे. काही लोक म्हणत होते की टीएमसीचे गुंड मतदान होऊ देणार नाहीत. मी म्हंटले की टीएमसीच्या कोणत्याही गुंडाची अशी ताकद नाही की बंगालमधील जनतेला रोखू शकेल. टीएमसीला मुळासकट उपटून बंगालच्या उपसागरात फेकून द्यायचे आहे. येथे घुसखोरी इतकी वाढली आहे की पश्चिम बंगालच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. ज्या राज्यांनी नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून भाजपची सत्ता स्थापन केली, ती राज्ये विकास करत असल्याचे शाह यांनी सांगितले.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी