
नवी दिल्ली , 02 एप्रिल (हिं.स.)।पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने भारताला मोठा दिलासा देत होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याचे आश्वासन दिले आहे. भारत हा मित्रदेश असल्याचे सांगत इराणने भारतीय ध्वज असलेली जहाजे आणि त्यावरील खलाशी सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे एलपीजी आणि कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत राहणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
इराणने म्हटले आहे की, होर्मुज सामुद्रधुनीतील परिस्थितीबाबत भारतीय मित्रांनी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. 28 फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर हा महत्त्वाचा जलमार्ग काही प्रमाणात बाधित झाला होता. भारतातील इराणच्या दूतावासाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले की, “आमचे भारतीय मित्र सुरक्षित हातात आहेत, काळजी करण्याचे कारण नाही.”
होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण असून या मार्गातून जगातील सुमारे 20 टक्के ऊर्जा पुरवठा होतो. संघर्ष सुरू झाल्यानंतर इराणने मर्यादित जहाजांनाच मार्ग देण्याची परवानगी दिली होती. भारत, चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तान यांसारख्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांना मात्र प्रवासाची परवानगी दिली जात असल्याचे इराणने सांगितले आहे.
आतापर्यंत किमान आठ भारतीय जहाजे होर्मुज सामुद्रधुनीतून बाहेर पडली आहेत. यामध्ये ‘बीडब्ल्यू टायर’ आणि ‘बीडब्ल्यू एल्म’ या दोन एलपीजी वाहतूक जहाजांचा समावेश असून त्यांच्यामध्ये एकूण सुमारे 94,000 टन एलपीजीचा माल होता.सध्या भारतासाठी एलपीजी, कच्चे तेल आणि एलएनजी घेऊन येणारी एकूण 19 जहाजे होर्मुज परिसरात अडकलेली आहेत. बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी 30 मार्च रोजी झालेल्या आंतर-मंत्रालयीय बैठकीत ही माहिती दिली.
भारतासाठी ऊर्जा माल घेऊन येणाऱ्या 10 परदेशी ध्वज असलेल्या जहाजांमध्ये 3 एलपीजी वाहक, 4 कच्चे तेल टँकर आणि 3 एलएनजी कॅरियरचा समावेश आहे. भारतीय ध्वज असलेल्या जहाजांमध्ये 3 एलपीजी टँकर, 1 एलएनजी कॅरियर आणि 4 कच्चे तेल टँकर आहेत. याशिवाय एक रिकामा टँकर एलपीजी भरण्याच्या प्रक्रियेत आहे. संघर्षाच्या काळात या अरुंद सामुद्रधुनीत एकूण सुमारे 500 जहाजे अडकली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode