
रायगड, 02 एप्रिल (हिं.स.) : रायगड जिल्ह्यात महसूल विभागातील तब्बल 238 पदे रिक्त असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रशासनावर गंभीर परिणाम झाला असून व्यवस्था अक्षरशः कोलमडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तलाठी, मंडळ अधिकारी आणि कोतवाल यांसारख्या गावपातळीवरील महत्त्वाच्या पदांमध्ये मोठी तूट निर्माण झाल्याने नागरिकांना दैनंदिन शासकीय कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सातबारा उतारे, फेरफार नोंदी, वारस दाखले तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी या कामांवर याचा थेट परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी एका तलाठ्याकडे दोन ते तीन गावांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याने कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिकांच्या नुकसानीचा पंचनामा, महसूल वसुली आणि नागरिकांना तातडीची मदत देणे या महत्त्वाच्या कामांमध्येही मोठा विलंब होत आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दरम्यान, कोतवालांच्या कमतरतेमुळे गावपातळीवर शासकीय योजना पोहोचवणे कठीण झाले आहे. दवंडी देणे, माहिती प्रसारित करणे आणि प्रशासनाला सहकार्य करणे ही कामेही ठप्प झाली आहेत.
या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. तातडीने रिक्त पदे भरली नाहीत, तर ग्रामीण विकासावर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.आता तरी शासन जागे होणार का? असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)