
पुणे, 02 एप्रिल, (हिं.स.)। वारकरी संप्रदायाची पावन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदीत एक धक्कादायक घटना घडली आहे. केळगाव-हनुमानवाडी येथील ठाकरवाडी येथे एका ६ वर्षांच्या चिमुरडीची गळा आवळून, तर तिला सांभाळणाऱ्या ७९ वर्षीय वृद्ध महिलेची डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हनुमानवाडी येथील रहिवासी संगीता दत्तात्रय गवारी या नेहमीप्रमाणे केळगाव येथील इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये हाऊस कीपिंगच्या कामासाठी रात्रपाळीला गेल्या होत्या. घरी त्यांची नात धनश्री सोनू दत्तात्रय केदारी (वय ६ वर्षे) आणि तिला सांभाळण्यासाठी शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय ७९ वर्षे) या दोघीच होत्या. मध्यरात्री अज्ञात इसमाने घरात शिरून गाढ झोपेत असलेल्या धनश्रीचा गळा आवळला, तर मंगल शिंदे यांच्या डोक्यावर गंभीर वार करून दोघांचीही हत्या केली. गुरुवारी सकाळी संगीता गवारी या कामावरून घरी परतल्यानंतर हा भीषण प्रकार उघडकीस आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून त्यांनी आरडाओरडा केला, त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुहेरी हत्याकांडामागील नेमका उद्देश काय ? चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला की काही जुन्या वादातून, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे आळंदी आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु