
ठाणे, 02 एप्रिल, (हिं.स.)। ठाण्यातली 'गुरुकुल प्रतिष्ठान' ही अभिजात संगीतात विविध उपक्रम राबविणारी एक अग्रगणी संस्था आहे. एका दशकाहून अधिक काळ या संस्थेतर्फे बासरीचे अनेक विद्यार्थी तयार होऊन आपल्या कलेचा ठसा उमटवत आहेत. सुविख्यात बासरीवादक पंडित विवेक सोनार यांच्या प्रयत्नांतून संस्थेतर्फे नावीन्यपूर्ण उपक्रम होत असतात. सकाळचे विविध राग ठाणेकरांना ऐकायला मिळावे या उद्देशातून युनियन बँक ऑफ इंडियाच्या सहकाऱ्याने Mygurukul मोबाईल अँप च्या सहकार्याने 'स्वरप्रभात' या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ वाजता आम्फिथिएटर, टाऊन हॉल, कोर्ट नाका, ठाणे येथे सादर होणार आहे.
सदर कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरसिया शिष्यवृत्ती मिळविलेले कलाकार वेंकटेशकुमार जाधव आणि अजय सोनवणे यांची सुंद्री आणि बासरी जुगलबंदी होणारा असून त्यांना अथर्व कुलकर्णी तबला संगत करतील. त्यानंतर कलकत्ता स्थित रोजी दत्त पंडीत यांचे शास्त्रीय गायन होणार असून त्यांना सुप्रिया जोशी हार्मोनियम आणि पुष्कराज जोशी तबल्यावर साथ देणार आहेत.कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुमेध समर्थ करतील. सदर कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुकुल प्रतिष्ठानचे संस्थापक आणि प्रसिद्ध बासरीवादक पंडित विवेक सोनार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर