
अमरावती, 20 एप्रिल (हिं.स.) परतवाडा येथे उघडकीस आलेल्या बहुचर्चित व्हिडिओ सेक्स स्कँडलप्रकरणी आता धार्मिक नेतृत्वही पुढे येत असून अचलपूर-परतवाडा येथील शहर-ए-काझी सय्यद गैसोद्दीन यांनी कडक भूमिका घेतली आहे. हा कोणत्याही धर्माशी संबंधित विषय नसून गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.काझी सय्यद गैसोद्दीन यांनी सांगितले की, आरोपी अयानच्या कृत्यामुळे शहराची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे हिंदू-मुस्लिम अशा दृष्टीने न पाहता केवळ गुन्हा आणि गुन्हेगार यावर लक्ष केंद्रित करावे. मुस्लिम समाजाने पुढे येत आरोपीविरोधात ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.शिक्षेबाबत बोलताना काझी भावूक झाले. “मी ७८ वर्षांचा आहे… आरोपीला लवकरात लवकर शिक्षा झाली तर मला समाधान मिळेल. जन्मठेप झाली तर ती पूर्ण भोगली पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.आरोपीच्या कुटुंबीयांच्या भूमिकेबाबत त्यांनी संतुलित प्रतिक्रिया देत, चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई व्हावी, मात्र अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सांगितले. तसेच या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. कायदा सर्वांसाठी समान असावा, असेही त्यांनी नमूद केले.पीडितांनी भीती न बाळगता पुढे यावे व तक्रार नोंदवावी, असे आवाहन करत पोलिसांकडून ओळख गोपनीय ठेवली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी