अमरावती मनपा निवडणुकीत वाद; अपत्यांची माहिती लपवल्याचा आरोप, नगरसेवकांविरुद्ध तक्रार
अमरावती, 20 एप्रिल (हिं.स.) अमरावती महानगरपालिकेच्या २०२६ च्या निवडणुकीत जमिल कॉलनी-लालखडी प्रभाग क्र. ४(ड) मधून निवडून आलेल्या ए.आय.एम.आय.एम. पक्षाच्या नगरसेवकांविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले असून त्यांच्या सदस्यत्व रद्द करण्यासाठी राज्य निवडणूक
अमरावती मनपा निवडणुकीत वाद; अपत्यांची माहिती लपवल्याचा आरोप, नगरसेवकांविरुद्ध तक्रार


अमरावती, 20 एप्रिल (हिं.स.)

अमरावती महानगरपालिकेच्या २०२६ च्या निवडणुकीत जमिल कॉलनी-लालखडी प्रभाग क्र. ४(ड) मधून निवडून आलेल्या ए.आय.एम.आय.एम. पक्षाच्या नगरसेवकांविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले असून त्यांच्या सदस्यत्व रद्द करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत निवडणूक अर्जात अपत्यांबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता शफीक राजा यांनी केला आहे.तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित नगरसेवकांनी नामनिर्देशनपत्रात फक्त दोन अपत्यांची नोंद केली होती. मात्र प्रत्यक्षात त्यांना तिसरे अपत्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. तक्रारदार स्वतःही या प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून पराभूत झाले होते. त्यांनी सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे की, संबंधित नगरसेवकांचा पहिला विवाह मध्यप्रदेशातील एका महिलेसोबत झाला असून त्या पत्नीपासून त्यांना दोन अपत्य आहेत. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी अमरावतीतील शबनम सैय्यद यांच्यासोबत दुसरा विवाह केला.तक्रारीनुसार, २२ जुलै २०२३ रोजी या दुसऱ्या पत्नीला अमरावतीतील एका खासगी रुग्णालयात मुलगी झाली. मात्र प्रसुतीवेळी रुग्णालयात दिलेल्या नोंदींमध्ये वडिलांच्या नावाबाबत चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे तिसऱ्या अपत्याची माहिती जाणीवपूर्वक लपविण्यात आली असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या १२ सप्टेंबर २००१ च्या नियमानुसार दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्या व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यास अपात्र ठरवले जाते. या पार्श्वभूमीवर संबंधित नगरसेवकांनी कायद्याची पायमल्ली करत चुकीची माहिती सादर केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.तक्रारदाराने या प्रकरणात संबंधित नगरसेवक व त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या अपत्याची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली असून, सत्य समोर आल्यास त्यांचे सदस्यत्व तात्काळ रद्द करावे तसेच फौजदारी कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.दरम्यान, या आरोपांमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता राज्य निवडणूक आयोग या प्रकरणात काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संबंधित नगरसेवकांकडून अद्याप या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande