विधान परिषद निवडणुकीत ‘धक्का तंत्र’? शिंदेंकडून बच्चू कडूंना ऑफरची चर्चा
अमरावती, 20 एप्रिल (हिं.स.) राज्यसभेप्रमाणेच आगामी विधान परिषद निवडणुकीतही ‘धक्का तंत्र’ वापरण्याची शक्यता व्यक्त होत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर दिल्याची जोरदार चर्चा राजकीय
विधान परिषद निवडणुकीत ‘धक्का तंत्र’? शिंदेंकडून बच्चू कडूंना ऑफरची चर्चा


अमरावती, 20 एप्रिल (हिं.स.)

राज्यसभेप्रमाणेच आगामी विधान परिषद निवडणुकीतही ‘धक्का तंत्र’ वापरण्याची शक्यता व्यक्त होत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.मुंबईत शिंदे आणि कडू यांची गुप्त भेट झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर येत आहे. या भेटीत विधान परिषदेसाठी कडूंना संधी देण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत जसे अनपेक्षित राजकीय समीकरणे पाहायला मिळाली, त्याच धर्तीवर विधान परिषदेतही राजकीय खेळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.दरम्यान, बच्चू कडू यांनी या संदर्भात सावध भूमिका घेतली आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांशी आणि समर्थकांशी सविस्तर चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.राज्यातील सत्तासमीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे. शिंदे गट आपली राजकीय ताकद वाढवण्यासाठी स्वतंत्र नेते आणि लहान पक्षांना सोबत घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत बच्चू कडू यांचा निर्णय निर्णायक ठरू शकतो.विधान परिषद निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या राजकीय हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत परिस्थिती अधिक स्पष्ट होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande