
अमरावती, 21 एप्रिल (हिं.स.) : परतवाडा येथील अयान अहमद याच्याशी संबंधित अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. या प्रकरणात माजी खासदार नवनीत राणा यांनी पीडित मुलींची माहिती सार्वजनिक केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत ही मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, आरोपींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, मात्र अधिकृत पोलीस माहिती येण्यापूर्वी माध्यमांमध्ये चुकीची माहिती पसरवून समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, पीडित मुलींची ओळख उघड केल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांच्यावर भारतीय दंड संहिता तसेच POCSO कायद्यानुसार तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे याहा खा पठाण, समाजवादी पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष जिया खान, शिवसेना (उबाठा)चे अहमद खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलबर शहा, रियाज खान, मोहम्मद अफसर आरिफ खान, डॉ. अब्दुल साजिद, अॅड. नईम अहमद यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी