
- वीज ग्राहक मात्र चार तास उकाड्यात
डोंबिवली, 21 एप्रिल (हिं.स.)। वीज वितरण वाहिन्यांवर पडणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणीची प्रक्रिया ही सुरक्षित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी महावितरण द्वारे केली जाते. यामध्ये वीज खांबांच्या जवळ येणाऱ्या फांद्या तोडल्या जातात, ज्यामुळे वादळ किंवा पावसात झाडे पडून तारा तुटणे, शॉर्ट सर्किट होणे किंवा वीज पुरवठा खंडित होणे टाळणे हा उद्देश असतो. मात्र सद्य स्थितीत डोंबिवली शहरात चार तास वीज बंद ठेवून होणारी ही कामकाजे थातूरमातूर स्वरूपाची होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
मंगळवारी जुनी डोंबिवली विभागात महावितरण माध्यमातून अशा प्रकारची कामे हाती घेण्यात आली. होती. मात्र ही कामे करताना कर्मचारी वर्गाची कमतरता आहे असे काम करताना संबंधित कर्मचारी सांगत होते. परिणामी झाडे छाटणी काम व्हायला पाहिजे तसे होत नव्हते. यामुळे काही स्थानिक नागरिकांनी याबाबत विचारणा केली असता आम्हाला दिलेल्या वेळेत काम करायचे असल्याने काम असेच होईल अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. पावसात हीच झाडे पुढे मोठी होऊन वीजप्रवाह खंडित होण्यास कारणीभूत ठरतील. पण समाधानकारक काम करण्यास महावितरण कंपनीची इच्छाशक्ती नसते असेच यामुळे समोर येत आहे.
अद्यापही जुनी डोंबिवली चौक येतील चौकात असलेल्या विद्युत पोलभोवती वाढलेली झाडे तशीच दिसून येत आहेत. या पोल माध्यमातून बाजूला असलेल्या दोन्ही मोठ्या ट्रान्सफॉर्मरला विजेची जोडणी असल्याने भविष्यात अशा वाढलेल्या झाडांमुळे वीजप्रवाह खंडित होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी जरी या कामाला दुजोरा दिला असला तरी अद्याप परिस्थिती जैसे थे अशीच आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi