
अमरावती, 21 एप्रिल (हिं.स.)
मागील सहा महिन्यांपासून जिल्हा हिवताप अधिकारी कायमस्वरूपी नेमण्यासाठी टोलवाटोलवी करीत असल्याचे दिसून येत आहे. कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करण्यास इतका उशीर का, काही आर्थिक व्यवहार तर झाला नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मागील सहा वर्षांपासून हिवताप विभागाचा कारभार एकाच प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू असल्याने शंका उपस्थित होत आहे.
हिवताप विभागाचा कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असून जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांचे पद मागील सहा वर्षांपासून रिक्त आहे. या रिक्त पदांचा कारभार अतिरिक्त वैद्यकीय अधिकाऱ्याकडे देऊन चालविला जात असला तरी याचा त्रास मेळघाटला सहन करावा लागत आहे. त्यामुळे या पदांवर कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी जनतेतून समोर आल्यानंतर याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर दोन महिन्यांत निर्णय घेणार असल्याचे सहायक संचालक यांनी सांगितले होते. मात्र आता सहा महिन्यांवर वेळ होऊन सुद्धा सहायक संचालकांनी निर्णय घेतला नाही. उलट हिवताप विभागाचे आरोग्य संचालक निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
जिल्ह्याचा कारभार ज्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे, ते जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्यकेंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वीचे स्थायी जिल्हा हिवताप अधिकारी यांची बदली झाल्यापासून आजपर्यंत सदर विभाग प्रभारीच्या भरवशावर सुरू आहे. आतापर्यंत जवळपास तीन चार अधिकाऱ्यांनी या पदावर प्रभारी म्हणून काम केले आहे. परंतु सहा वर्षांपेक्षा जास्त काळ झाला असतानाही हे अधिकारी याच ठिकाणी कार्यरत आहेत. सहा वर्षांपासून एकाच ठिकाणी एकाच अधिकाऱ्याच्या खांद्यावर जबाबदारी देण्यामागे आर्थिक व्यवहार तर झाला नाही ना, असा प्रश्न आता विचारला जात आहे. याकडे आरोग्यमंत्री यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी