
उष्मालाटेच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या वेळेत कपात
अमरावती, 21 एप्रिल (हिं.स.) : विदर्भात वाढत असलेल्या तापमानाची तीव्रता आणि उष्मालाटेचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांच्या वेळेत कपात करण्याचे आदेश जारी केले असून, आता शाळा सकाळी ७ ते १० या वेळेतच चालणार आहेत.
हा आदेश 21 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत लागू राहणार असून, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, अंगणवाडी आणि नर्सरींसाठी बंधनकारक असेल. यात अनुदानित, विनाअनुदानित तसेच खासगी शाळांचाही समावेश आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सकाळी 10 नंतरच्या उर्वरित तासिका ऑनलाइन किंवा डिजिटल माध्यमातून घेण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.
वाढत्या उष्णतेचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोणत्याही परिस्थितीत सकाळी 10 नंतर शाळा सुरू ठेवता येणार नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीची सोय आणि उष्मालाटेपासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी