
दक्षिण दिनाजपूरमध्ये सर्वाधिक, तर कलिंपोंगमध्ये सर्वात कमी मतदान
कोलकाता, 23 एप्रिल (हिं.स.) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांतील 152 जागांवर गुरुवारी शांततेत आणि उत्साहात मतदान पार पडले. या टप्प्यात एकूण 92.35 टक्के मतदानाची नोंद झाली असून, 2021 च्या तुलनेत हा आकडा लक्षणीयरीत्या जास्त आहे.
निवडणूक हिंसाचारासाठी कुख्यात असलेल्या पश्चिम बंगालमध्ये यावेळी परिस्थिती पूर्णपणे उलट दिसली. विशेष गहन पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेनंतर झालेल्या या मतदानाबाबत नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या होत्या.कडक सुरक्षा व्यवस्थेत युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने मतदानासाठी सहभागी झाले. प्रशासनाच्या माहितीनुसार रात्री 9 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 92.35 टक्के इतकी नोंदली गेली, जी 2021 च्या तुलनेत सुमारे 10 टक्के अधिक आहे.दक्षिण दिनाजपूरमध्ये सर्वाधिक 94.87 टक्के मतदान झाले, तर कूचबिहारमध्ये 94.58 टक्के मतदान नोंदवले गेले. नंदीग्राममध्येही 91.87 टक्के मतदान झाले. या निवडणुकीसाठी केंद्रीय दलांच्या 2407 कंपन्या, 2193 क्विक रिस्पॉन्स टीम्स आणि सुमारे 40,000 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे मतदान प्रक्रिया तुलनेने शांततेत पार पडली.तापमान काही जिल्ह्यांमध्ये 40 अंशांपर्यंत पोहोचले तरीही मतदारांचा उत्साह कमी झाला नाही.
किरकोळ हिंसाचार आणि चौघांचा मृत्यू
बीरभूम जिल्ह्यात केंद्रीय दलांवर दगडफेक; 6 जवान जखमी झाले. तर दक्षिण दिनाजपूरमध्ये भाजप उमेदवारावर हल्ला करण्यात आला असून याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आलीय. तसेच आसनसोलमध्ये भाजप उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या गाडीवर हल्ल्याची घटना घडली तर मुर्शिदाबादमध्ये स्फोट आणि त्यानंतर झालेल्या संघर्षाप्रकरणी 3 जण ताब्यात घेतले आहेत. याशिवाय निवडणूक आयोगाकडे 1000 पेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याशिवाय मतदान प्रक्रियेदरम्यान 4 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना नोंदल्या गेल्या. काही जण मतदानानंतर घरी परतताना अस्वस्थ झाले, तर काहींची मतदान केंद्रावरच तब्येत बिघडली.
दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
या टप्प्यात अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद झाले आहे, त्यामध्ये सुवेंदू अधिकारी (नंदीग्राम),अधीर रंजन चौधरी (बहरमपूर), दिलीप घोष (खडगपूर सदर),गौतम देव व शंकर घोष (सिलीगुडी), उदयन गुहा (दिनहाटा), अशोक डिंडा (मयना),हुमायून कबीर (नउदा व रेजीनगर)एकूणच, पश्चिम बंगालच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शांतता, उत्साह आणि विक्रमी मतदानामुळे चर्चेत राहिले, मात्र काही किरकोळ हिंसक घटनांनी वातावरण थोडे तणावपूर्णही केले.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी