
राज्यातील 234 जागांवर एकाच टप्प्यात झाले मतदान
चेन्नई, 23 एप्रिल (हिं.स.) : तमिळनाडूमध्ये गुरुवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्याने मतदानाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. राज्यातील 234 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली असून, यंदा विक्रमी 84.73 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
निवडणूक आयोगाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, मतदान प्रक्रियेत कडक सुरक्षा व्यवस्था आणि 3.6 लाखांहून अधिक निवडणूक कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांब रांगा दिसून आल्या. तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये मतदानाबाबत मोठा उत्साह पाहायला मिळाला. यापूर्वी 2011 मधील 78.01 टक्के मतदानाचा विक्रम यंदाच्या निवडणुकीने मोडीत काढला आहे. तर 2021 मधील 73.63 टक्के मतदानाच्या तुलनेत यंदा लक्षणीय वाढ झाली आहे. मतदार यादीतील फेरतपासणीनंतर मतदारसंख्या 6.41 कोटींवरून 5.73 कोटींवर आली असली, तरी मतदानाचा टक्का वाढल्याने हा आकडा अधिक लक्षणीय ठरतो आहे.
तमिळनाडूच्या राजकीय इतिहासात 1952 मध्ये फक्त 52 टक्के मतदान झाले होते, तर 1967 मध्ये प्रथमच 75 टक्क्यांचा टप्पा ओलांडण्यात आला होता. यापूर्वी 2016 आणि 2021 मध्ये मतदानाचा टक्का काहीसा घटलेला होता, मात्र यंदाच्या निवडणुकीने पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत दिले आहेत. या निवडणुकीत महिलांची भूमिका विशेष महत्त्वाची ठरली आहे. पुरुष मतदारांच्या तुलनेत सुमारे 10 लाख अधिक महिला मतदारांनी मतदान केले आहे. एकूण 2.93 कोटी महिला आणि 2.83 कोटी पुरुष मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यामुळे महिलांचा प्रभावी सहभाग पुन्हा एकदा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, अभिनेता थलपती विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळगम’ (टीव्हीके) पक्षाच्या प्रवेशामुळे यंदाची निवडणूक अधिक रंगतदार आणि त्रिकोणी झाली आहे. तसेच सीमान यांच्या एनटीके पक्षानेही आपला प्रभाव वाढवला आहे.
आता संपूर्ण राज्याचे लक्ष 4 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. हा विक्रमी मतदानाचा कल विद्यमान सरकारच्या पुनरागमनाकडे निर्देश करतो की नव्या राजकीय बदलाचे संकेत देतो, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
-------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी