
नवी दिल्ली, 24 एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही कोणतीही 'सुप्रिमेसिस्ट' किंवा वर्चस्ववादी संघटना नसून ती हिंदू संस्कृतीवर आधारित राष्ट्रभक्त संघटना आहे. हिंदूंनी आपल्या प्रदीर्घ इतिहासात कधीही कोणत्याही देशावर आक्रमण केले नाही किंवा कोणाला गुलाम बनवले नाही, त्यामुळे हिंदूंना कोणाचीही माफी मागण्याची गरज नाही, असे ठाम प्रतिपादन संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले.
अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील हडसन युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात बोलताना होसबळे यांनी जागतिक राजकारण, हिंदू धर्म आणि संघ विचारांवर सविस्तर भाष्य केले. याप्रसंगी ते म्हणाले की, हिंदू संस्कृती ही सर्वांना सामावून घेणारी आहे. हिंदूंनी कोणावरही आमची विचारधारा लादली नाही. हिंदू धर्माने जगाला 'वसुधैव कुटुंबकम' (जग हे एक कुटुंब आहे) हा विचार दिला आहे. त्यामुळे हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाबद्दल आम्हाला अभिमान असून माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असे होसबळे यांनी सांगितले. याप्रसंगी संस्कृतीवर बोलताना सरकार्यवाह म्हणाले की, संस्कृती आणि आधुनिकता हे एकमेकांचे शत्रू नसून ते हातात हात घालून चालू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. सनातन परंपरा या शाश्वत आहेत आणि त्या काळानुसार अधिक समृद्ध होत जातात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात सरकार्यवाहांनी महत्त्वाचे विधान केले. भाजपमध्ये येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाचे प्रचारक होते हे सर्वज्ञात आहे. परंतु, संघ आणि मोदी परस्परांबाबत आदरार्थी विधाने करीत असले तरी भरभरून बोलताना दिसत नाही. परंतु, या मुलाखतात होसबळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात अतिशय मोकळेपणाने बोलले.
मोदींच्या संघर्षाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल बोलताना होसबळे म्हणाले की, मोदींचा प्रदीर्घ काळ संघाशी संबंध राहिला असून संघाने दिलेल्या संस्कारांमधूनच मोदींचे नेतृत्व घडले आहे. नरेंद्र मोदी संघातच वाढले असून त्यांनी संघाचे विचार सरकारद्वारे प्रत्यक्षात आणले याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे होसबळे यांनी मुलाखतीदरम्यान अधोरेखित केले.
देशाच्या नावाबाबत बोलताना त्यांनी 'भारत' या शब्दाचा आग्रह धरला. जगात अशा कोणत्या देशाची दोन नावे आहेत का ? आपण आपल्या देशाला 'भारत' म्हणूनच संबोधले पाहिजे असे होसबळे म्हणाले. सामाजिक सलोख्यावर भाष्य करताना त्यांनी मुस्लिम बांधवांना आवाहन केले की, त्यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नद्यांची पूजा करावी, तसेच शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी प्राणायाम आणि सूर्यनमस्कार यांचा अंगीकार करावा असे आवाहन त्यांनी केले.
परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांनी (डायस्पोरा) ज्या देशात ते राहत आहेत, त्या देशाशी पूर्णपणे एकनिष्ठ राहावे. मात्र, त्याच वेळी आपल्या भारतीय मुळांशी आणि सांस्कृतिक मूल्यांशी असलेले नाते कधीही तोडू नये, असे आवाहन देखील होसबळे यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाबद्दल बोलताना होसबोले म्हणाले की, हे वर्ष आमच्यासाठी केवळ उत्सवाचे नाही, तर आत्मचिंतनाचे आहे. आम्ही अजूनही आमचे ध्येय पूर्ण केलेले नाही; अजून खूप मोठे कार्य बाकी आहे. या मुलाखतीद्वारे दत्तात्रेय होसबोले यांनी जागतिक स्तरावर संघाची भूमिका स्पष्ट करत हिंदू संस्कृतीचा मानवतावादी चेहरा जगासमोर मांडला.------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी