
नागपूरमध्ये भारतदुर्गा शक्ती स्थळाचा शिलान्यास
नागपूर, 24 एप्रिल (हिं.स.) : भारतमातेच्या पूजनासाठी प्रत्येकाने स्वतः ‘भारत’ बनणे आवश्यक आहे. त्यासाठी देशाला जाणून घेऊन त्याला आपले मानावे लागेल, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात श्री आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेद्वारा प्रस्तावित ‘भारतदुर्गा शक्ती स्थळा’च्या शिलान्यास कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला देशभरातील संत-महंतांची उपस्थिती होती. यामध्ये श्री जुना आखाडा पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी, स्वामी गोविंददेव गिरी महाराज, चिन्मय मिशनचे स्वामी मित्रानंद महाराज, बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री, साध्वी ऋतुंभरा, माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. भागवत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शक्तीशिवाय कोणतेही कार्य साध्य होत नाही. सत्यालाही जगात प्रस्थापित करण्यासाठी शक्तीची आवश्यकता असते. भारतात सत्यासाठी शक्तीची गरज कमी भासते, परंतु इतर देशांमध्ये ‘जिसकी लाठी उसकी भैंस’ हीच भूमिका दिसते. नागपूरात उभारण्यात येणारे भारतदुर्गा मंदिर हे केवळ एक स्थळ न राहता संपूर्ण देशभरात पूजाअर्चनेची प्रेरणा देणारे ठरेल, असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, दीडशे वर्षांच्या गुलामगिरीमुळे भारतीयांच्या मनावर पाश्चिमात्य विचारांचा प्रभाव पडला आहे. तो दूर करून दैनंदिन जीवनापासून राष्ट्रीय विषयांपर्यंत ‘भारत’ होण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. लहान कृतींमधून ही प्रक्रिया सुरू केल्यास उद्दिष्ट निश्चित साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘भारताचे पुनर्वैभव निश्चित परत येईल’
आजच्या जागतिक परिस्थितीत भारत ‘विश्वगुरू’ बनेल का, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. राम मंदिराच्या उभारणीबाबतही पूर्वी असा संभ्रम होता, मात्र दृढ विश्वासामुळे ते साकार झाले. त्याचप्रमाणे भारताचा मार्ग जगाने स्वीकारला नाही, तर त्याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतील, असे मत डॉ. भागवत यांनी व्यक्त केले. प्रत्येक भारतीयाने ‘भारतदुर्गा’ची संकल्पना आचरणात आणल्यास देशाचे पुनर्वैभव निश्चित परत येईल, असे त्यांनी सांगितले.यावेळी आचार्य स्वामी अवधेशानंद गिरी यांनी भारताला ‘जगदंबेचे स्वरूप’ संबोधत भारतदुर्गा मंदिर हे 52 वे शक्तीपीठ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. साध्वी ऋतुंभरा यांनी हिंदू समाजातील विभागणीवर भाष्य करत एकत्रित येण्याचे आवाहन केले. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी भारतदुर्गा मंदिर देशाला अधिक शक्तिशाली बनवेल, असे मत व्यक्त केले. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी रामराज्याची स्थापना होईपर्यंत कार्य अपूर्ण असल्याचे सांगत समाजाने अन्यायाविरोधात उभे राहण्याची गरज अधोरेखित केली.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी