
रत्नागिरी, 24 एप्रिल, (हिं. स.) : कला क्षेत्रातील प्रसिद्ध 'आर्ट सर्कल फाउंडेशन'च्या वतीने कै. नलिनी प्रताप कानविंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'शाम-ए-गझल' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन येत्या रविवारी, २६ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आले आहे.
यंदा या स्मृती सोहळ्याचे सहावे वर्ष असून यानिमित्ताने गझल गायन स्पर्धेची अंतिम फेरी आणि सुप्रसिद्ध गझल गायक दत्तप्रसाद रानडे यांची मैफिल अनुभवण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळणार आहे.
स्पर्धेला महाराष्ट्रभरातून उत्तम प्रतिसाद लाभला. प्राथमिक फेरीतून १० अंतिम स्पर्धक निवडण्यात आले. ते असे - प्रवीण देशमुख, पुणे. रोहन देशमुख मुंबई. धीरेश काणेकर, सिंधुदुर्ग.
आदिती माईणकर, रत्नागिरी. गौतमी वाडकर, संगमेश्वर. लीना खामकर, रत्नागिरी. रूपाली विघारे, पुणे. गिरीश जोशी, रत्नागिरी. प्रतीक्षा कोयंडे, कणकवली आणि स्वरा अभ्यंकर, रत्नागिरी.
या स्पर्धकांची अंतिम फेरी होईल आणि त्यातून विजेते घोषित होतील.
झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवन येथे हा स्वरसोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमाचे स्वरूप दोन सत्रांत असून त्याचे नियोजन असे -
१. गझल गायन स्पर्धा (अंतिम फेरी) : दुपारी ३:०० ते ६:३०. निवडक स्पर्धकांमधून सर्वोत्कृष्ट गझल गायकाचा शोध या माध्यमातून घेतला जाणार आहे.
२. ‘शाम-ए-गझल’ मुख्य मैफिल : संध्याकाळी ६:३० ते ८:०० या वेळेत लोकप्रिय हिंदी-मराठी गझल मैफिल रंगणार आहे. सुप्रसिद्ध गझल गायक दत्तप्रसाद रानडे आपल्या मखमली आवाजात गझल सादर करतील. त्यांना तबल्यावर हेरंब जोगळेकर आणि व्हायोलिनवर उदय गोखले साथसंगत करणार आहेत. मैफलीला प्रवेश विनामूल्य आहे.
गझल आणि साहित्याची ओढ असणाऱ्या रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य खुला आहे. रत्नागिरीतील जास्तीत जास्त रसिकांनी या सांगीतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आर्ट सर्कल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी