
छत्रपती संभाजीनगर, 25 एप्रिल (हिं.स.)। महापालिकेची बंद पडलेली 'महापौर चषक एकांकिका स्पर्धा' शहरातील रंगकर्मी आणि नाट्यप्रेमींसाठी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाट्यकर्मीसोबत झालेल्या बैठकीनंतर महापौर समीर राजूरकर यांनी ही माहिती दिली.
शहरातील नाट्य, सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळींना चालना देण्यासाठी महापौरांच्या दालनात बैठक झाली. यावेळी महानगरपालिकेत सांस्कृतिक अधिकाऱ्याची नियुक्ती लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिले. तसेच, शहरात त्रैभाषिक कविसंमेलन आणि संगीत महोत्सव आयोजित करण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीला आयुक्त अमोल येडगे यांच्यासह प्रा. दिलीप घारे, प्रा. दासू वैद्य, प्रा. मुस्तजीब खान, प्रेषित रुद्रावार, मुकुंद गोलटगावकर, मदन मिमरोट, सत्यजीत गायकवाड, सारंग टाकळकर, संदीप सोनार, प्रशांत म्हस्के, योगिता तळेकर, अविनाश ठिगळे आदी उपस्थित होते.
नाट्यकर्मीनी स्थानिक कलाकारांना नाट्यगृहाच्या देण्याची मागणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व स.भु. महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना पालिका शाळांमध्ये नाट्य प्रशिक्षण देण्याची संधी देण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis