
नवी दिल्ली, २५ एप्रिल (हिं.स.) भारतीय हॉकीचे दिग्गज आणि १९६८ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते गुरबक्स सिंग ग्रेवाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते आणि त्यांनी झिराकपूर येथे अखेरचा श्वास घेतला.
हॉकी इंडियाने त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. हॉकी इंडियाच्या माहितीनुसार,गुरबक्ष सिंग ग्रेवाल हे १९६८ च्या मेक्सिको सिटी ऑलिम्पिकमध्ये देशासाठी कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होते. भारतीय हॉकीच्या इतिहासातील त्या मोजक्या खेळाडूंपैकी ते एक होते, ज्यांनी आपल्या कामगिरीने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला गौरव मिळवून दिला.
त्यांच्या विशेष कामगिरींपैकी एक म्हणजे, त्यांनी त्यांचे बंधू बलबीर सिंग ग्रेवाल यांच्यासोबत एकाच ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. ही एक दुर्मिळ घटना होती, जेव्हा दोन सख्खे भाऊ एकाच ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा भाग होते.
खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतरही, गुरबक्स सिंग ग्रेवाल यांनी हॉकीशी आपले नाते जपले होते. त्यांनी पश्चिम रेल्वेमध्ये वरिष्ठ क्रीडा अधिकारी म्हणून काम केले आणि राजस्थानमधील खेळाडूंसह अनेक प्रतिभावान खेळाडूंना रेल्वे हॉकी संघात ओळखण्यात व भरती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
सेवेतून निवृत्त झाल्यानंतर, मुंबईत राहत असताना, त्यांनी क्रीडा प्रशासनात सक्रियपणे सहभाग घेतला. त्यांनी मुंबई हॉकी असोसिएशनचे मानद सचिव म्हणून काम केले आणि हॉकीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे