आनंद वार्ता - यंदा 18 ते 25 मे दरम्यान पावसाचे आगमन
- युरोपीयन मध्यम श्रेणी हवामान अंदाज केंद्राचा अंदाज मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.) - एप्रिलमध्ये उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांनी बेजार झालेल्या नागरिकांना दिलासादायक वार्ता आहे. नवीन संकेतानुसार मान्सून गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही मे अखेरीस डेरेदाख
मान्सून आगमन


- युरोपीयन मध्यम श्रेणी हवामान अंदाज केंद्राचा अंदाज

मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.) - एप्रिलमध्ये उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांनी बेजार झालेल्या नागरिकांना दिलासादायक वार्ता आहे. नवीन संकेतानुसार मान्सून गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही मे अखेरीस डेरेदाखल होण्याची सुखद वार्ता मिळत आहे. युरोपीयन मध्यम श्रेणी हवामान अंदाज केंद्राने (ECMWF) नवीन अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, मान्सून अगोदर अंदमान-निकोबार बेटावर धडकेल. येत्या 18 ते 25 मे या कालावधीत पावसाचे आगमन होईल. एकीकडे महाराष्ट्रातच नव्हे, देशाच्या अनेक भागांत तापमान 40-44 डिग्रीपर्यंत पोहचले आहे. उत्तर, मध्य आणि पूर्वोत्तर भारत उष्णतेच्या लाटेत होरपळला आहे. तर अल-निनोमुळे यंदा मान्सून लांबण्याचा आणि पाऊस उशिरा येण्याचा दावा करण्यात येत होता. परिणामी शेतकऱ्यांसह सरकारही चिंतेत आले होते.

युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टने म्हटले आहे की, गेल्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये २७ ते २९ मे दरम्यान भारतात मान्सून दाखल झाला होता. यावर्षीही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून दक्षिण भारतात दाखल होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मे महिन्याच्या मध्यात अथवा अखेरीस अंदमान-निकोबार बेटासह दक्षिण भारतात पाऊस हजेरी लावेल. या पट्ट्यात 30 ते 60 मिमीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 25 मे ते 1 जून या दरम्यान केरळ आणि तामिळनाडूच्या दक्षिण टप्प्यात पावसाचे आगमन होईल. यामुळे शेतीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे. तर गरमी, उष्णतेने हवालदिल झालेल्या नागरिकांसह पशूपक्ष्यांना आणि प्राण्यांना मोठा दिलासा मिळेल.

हवामान तज्ज्ञानुसार, सध्याचे सर्व हवामानाचे संकेत हे बंगालच्या खाडीत आणि अंदमानच्या समुद्रावरून दक्षिण-पश्चिम दिशेने वेगवान वारे दर्शवत आहेत. हेच वारे समुद्रावरून आर्द्रता घेऊन येते. या थंडगार वाऱ्यामुळे पावसाची शक्यता वाढते. याशिवाय अंदमानच्या उत्तर पट्ट्यात एक चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून अवघ्या 20 दिवसात भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.

हवामान तज्ज्ञ देवेंद्र त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सूनचे आगमन अधिक लवकर होईल. तर अल निनोची (El Nino) कोणतीही भीती नसेल. मान्सूनसाठी सध्या सकारात्मक वातावरण आहे. तर इंडियन ओशन डायपोलची (IOD) भूमिकाही महत्त्वाची मानली जात आहे. यामध्ये हिंद महासागराच्या पूर्व आणि पश्चिम भागातील समुद्राचे तापमान ठरते. या तापमानात अंतर असते. मान्सूनसाठी आयओडी अनुकूल मानल्या जात आहेत. सध्या उष्णतेने जमीन तापली आहे. कडक उन्हामुळे पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे मानले जात आहे. अजून 15 दिवस कडक उन्हामुळे मान्सूनसाठी चांगले वातावरण असेल, असा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान महाराष्ट्रासह उत्तर आणि पूर्व भारतातील तापमान वाढले आहे. अनेक भागांमध्ये तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. काही भागात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव असणार असून, भारतीय हवामान विभागाने तापमान वाढवण्याचा इशारा दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande