
ठाणे, 29 एप्रिल, (हिं.स.)। मुरबाड तालुक्यातील टोकावडे गावातील ज्येष्ठ नागरिक व शेतकरी श्रीमती पार्वती शंकर पवार (वय ८८) यांचे आज सकाळी वृद्धापकाळामुळे निधन झाले. ठाणे महापालिकेतील नगरसेवक नारायण पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पवार यांच्या त्या आई होत.
टोकावडे परिसरात प्रगतीशील शेतकरी म्हणून पवार कुटुंबियांची ओळख आहे. श्रीमती पार्वती शंकर पवार यांनी पती स्व. शंकरराव पवार यांच्याबरोबर शेतीमध्ये नवे प्रयोग केले. शेतकऱ्यांच्या व समाजाच्या प्रगतीसाठी त्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती वृद्धापकाळामुळे बिघडली होती. अखेर आज सकाळी सहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर टोकावडे येथे आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर