
मुंबई, 29 एप्रिल (हिं.स.) - येथील मानखुर्द परिसरात महापालिकेच्या रस्ते कामादरम्यान एक भीषण अपघात घडला. अंगावर ड्रिंलीन क्रेन कोसळल्याने संतोष गोपाळ चव्हाण नावाच्या पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. ते नेहरू नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्याकडून संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास सुरू आहे.
मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीत, सायन-पनवेल मार्गाच्या उत्तर वाहिनीवर मुंबई महापालिकेच्या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी एक्साव्हेटर ड्रिलिंग क्रेन वापरली जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदाराने ही क्रेन भुसभुशीत जमिनीवर उभी केली होती. कामाच्या दरम्यान तोल जाऊन ही अवजड क्रेन अचानक रस्त्यावरून जाणाऱ्या संतोष चव्हाण यांच्या दुचाकीवर (एमएच ४३ डब्लू ३२३८) कोसळली. या भीषण अपघातात चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांनी एकूण २३ वर्षे पोलीस दलात सेवा बजावली आहे.
प्राथमिक तपासानुसार, हा अपघात ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे समोर येत आहे. क्रेन लावताना जमिनीचा अंदाज न घेणे आणि सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणे याला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. क्रेन चालक आणि कामाच्या देखरेखीसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे. संतोष चव्हाण हे तेथून दुचाकीवरून नवी मुंबई येथील घरी जात होते. त्यांच्या अंगावर हे यंत्र पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी