आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 115 डॉलरच्या पार
नवी दिल्ली, 29 एप्रिल (हिं.स.)। पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारात मोठी उलथापालथ होत असून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. जागतिक स्तरावरील प्रमुख निर्देशांक असलेल्या ब्रेंट क्रूड तेलाने 115 डॉलर प्रति बॅरलच
Crude Oil Price Hike


नवी दिल्ली, 29 एप्रिल (हिं.स.)। पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारात मोठी उलथापालथ होत असून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. जागतिक स्तरावरील प्रमुख निर्देशांक असलेल्या ब्रेंट क्रूड तेलाने 115 डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला, तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (डब्ल्यूटीआय) क्रूडनेही 104 डॉलरचा स्तर पार केला आहे.

मंगळवारच्या तुलनेत ब्रेंट क्रूडने 110.62 डॉलरवर व्यवहार सुरू केला, मात्र दिवसभरात तेजी कायम राहिल्याने भारतीय वेळेनुसार सायंकाळी पाचच्या सुमारास तो 115.61 डॉलरपर्यंत झेपावला. त्यानंतर थोडीशी घसरण झाली असली तरी सायंकाळी सहापर्यंत तो 115.49 डॉलरवर, म्हणजेच 3.80 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता. दुसरीकडे डब्ल्यूटीआय क्रूडने सुरुवातीला 99.23 डॉलरवरून घसरण दाखवली, पण नंतरच्या सत्रात जोरदार वाढ होत 104.32 डॉलरपर्यंत पोहोचला आणि दिवसाअखेरीस 104.09 डॉलरवर स्थिरावला.

फ्युचर्स बाजारातही तेजीचा कल कायम असून जून महिन्यासाठी ब्रेंट फ्युचर्स 111.26 डॉलरवर बंद झाले, तर डब्ल्यूटीआय फ्युचर्स 99.93 डॉलरपर्यंत पोहोचले. सलग सात दिवस ब्रेंटमध्ये वाढ नोंदली गेली आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेतील विलंब आणि होर्मुज सामुद्रधुनीत वाढती नाकेबंदी यामुळे पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे. जगातील सुमारे 20 टक्के तेल पुरवठा या मार्गे होत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

या पार्श्वभूमीवर भारतासारख्या आयात-आधारित देशांसाठी मोठे आर्थिक आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. वाढत्या किमतीमुळे चालू खात्यातील तूट वाढू शकते, वित्तीय तुटीवर दबाव येऊ शकतो आणि रुपयाची घसरण होऊ शकते. त्याचबरोबर महागाई वाढण्याची आणि परकीय गुंतवणुकीचा ओघ कमी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढूनही देशातील पेट्रोल-डिझेल दर स्थिर ठेवण्यात आले आहेत, त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढत असून त्यांचे नुकसानही वाढत असल्याचे चित्र आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande