
रायगड, 29 एप्रिल, (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा शंभर टक्के लाभ मिळेल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. बैठकीस खासदार सुनील तटकरे सहअध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी योजनांच्या अंमलबजावणीत जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या किंवा निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. योजनांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि वेळेचे नियोजन राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीस आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
खासदार बारणे यांनी जल जीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची नियमित तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत आहे की नाही याची खातरजमा करून आवश्यक दुरुस्त्या तात्काळ करण्यावर त्यांनी भर दिला. तर खासदार तटकरे यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे केवायसी पूर्ण करण्याबरोबरच सेंद्रिय शेतीसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, कौशल्य विकास योजना आदी विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. योजनांचा लाभ नागरिकांना पारदर्शक व सुलभ पद्धतीने मिळावा यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावरही भर देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)