
रायगड, 29 एप्रिल (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील अंबा आणि कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या क्षमतावाढीसाठी राज्य शासन आणि एनटीपीसी लिमिटेड यांच्यात सुधारित सामंजस्य करार करण्यात आला. मंत्रालयातील समिती सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार झाला. या करारामुळे दोन्ही प्रकल्पांची एकूण वीज निर्मिती क्षमता १८०० मेगावॅटवरून २६०० मेगावॅटपर्यंत वाढणार आहे.
कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे तसेच एनटीपीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर आणि एनटीपीसीचे विभागीय कार्यकारी संचालक ई. सत्या फानी कुमार यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, एनटीपीसीने अंबा आणि कुंभे प्रकल्पांचे सविस्तर सर्वेक्षण केल्यानंतर प्रकल्प क्षमतेत वाढ शक्य असल्याचे स्पष्ट झाले. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने (CEA) यासंदर्भात मूळ सामंजस्य करारात सुधारणा करण्याची सूचना केली होती. त्यानुसार अंबा प्रकल्पाची क्षमता ८०० मेगावॅटवरून १५०० मेगावॅट तर कुंभे प्रकल्पाची क्षमता १००० मेगावॅटवरून ११०० मेगावॅट करण्यात आली आहे.
राज्य शासनाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) माध्यमातून उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करण्याचे धोरण डिसेंबर २०२३ मध्ये जाहीर केले होते. आतापर्यंत राज्यात ६० सामंजस्य करार करण्यात आले असून त्याद्वारे ८२ हजार मेगावॅटपेक्षा अधिक वीज निर्मिती क्षमता निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पांमुळे सुमारे ४.२८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याचे सांगण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील या प्रकल्पांमुळे भविष्यात ऊर्जा निर्मितीबरोबरच स्थानिक विकास आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)