होर्मुजमध्ये अडथळा म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का, भारताची यूएनमध्ये स्पष्ट भूमिका
नवी दिल्ली , 29 एप्रिल (हिं.स.)।पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने जागतिक व्यापाराच्या दृष्टीने होर्मुज सामुद्रधुनीतील सुरक्षित आणि निर्बाध समुद्री वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे आवाहन केले आहे. या महत्त्वाच्या जलमार्गात क
होर्मुजमध्ये अडथळा म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का, भारताची यूएनमध्ये स्पष्ट भूमिका


नवी दिल्ली , 29 एप्रिल (हिं.स.)।पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने जागतिक व्यापाराच्या दृष्टीने होर्मुज सामुद्रधुनीतील सुरक्षित आणि निर्बाध समुद्री वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे आवाहन केले आहे. या महत्त्वाच्या जलमार्गात कोणताही अडथळा निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होतो, असे भारताच्या स्थायी मिशनच्या प्रभारी योजना पटेल यांनी स्पष्ट केले.संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ‘समुद्री क्षेत्रातील जलमार्गांची सुरक्षा आणि संरक्षण’ या विषयावर आयोजित खुल्या चर्चासत्रात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राजदूत योजना पटेल यांनी भारताची भूमिका मांडताना सांगितले की, होर्मुजमार्गे जाणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे केवळ निषेधार्ह नाही, तर आंतरराष्ट्रीय कायद्याच्याही विरोधात आहे. कोणत्याही परिस्थितीत व्यापारी जहाजे आणि निरपराध नागरी चालक दलावर लष्करी हल्ले होता कामा नयेत, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. योजना पटेल म्हणाल्या की, भारतासाठी हा जलमार्ग ऊर्जा आणि आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्याच्या संघर्षादरम्यान भारतीय नाविकांचा मृत्यू झाल्याबद्दल त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. समुद्री मार्गांची सुरक्षा आणि नौवहनाचे स्वातंत्र्य हे जागतिक शांतता व समृद्धीसाठी अत्यावश्यक असल्याचा पुनरुच्चार भारताने केला.

भारताने हेही अधोरेखित केले की, होर्मुज हा जगातील सर्वाधिक वर्दळीच्या तेल आणि वायू वाहतूक मार्गांपैकी एक आहे. जागतिक ऊर्जा पुरवठ्याचा मोठा हिस्सा या मार्गाने जातो. त्यामुळे येथे निर्माण होणारी कोणतीही अस्थिरता आंतरराष्ट्रीय बाजारपेठा, पुरवठा साखळी आणि अन्नसुरक्षेलाही प्रभावित करू शकते. आपल्या भाषणात भारताने आंतरराष्ट्रीय कायद्याच्या पालनावर भर देत सांगितले की, व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे आणि नौवहन स्वातंत्र्यात अडथळा आणणे अस्वीकार्य आहे. भारताने सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे, तणाव वाढवू न देण्याचे आणि संवाद व कूटनीतीच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे आवाहन केले.

यासोबतच भारताने पश्चिम आशियातील व्यापक परिस्थितीबाबतही चिंता व्यक्त केली. या प्रदेशातील घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, ऊर्जा पुरवठा, व्यापार आणि जागतिक पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे भारताने नमूद केले. भारताने हेही सांगितले की, आखाती प्रदेशात सुमारे एक कोटी भारतीय राहतात आणि काम करतात, त्यांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. शेवटी भारताने स्पष्ट केले की, प्रदेशात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षित समुद्री मार्ग सुनिश्चित करण्यासाठी सर्व रचनात्मक प्रयत्नांना तो पाठिंबा देत राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande