
नवी दिल्ली, 29 एप्रिल (हिं.स.) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी किर्गिस्तानची राजधानी बिशेक येथे आयोजित शंघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेदरम्यान चीनचे संरक्षण मंत्री डाँग जून यांची महत्त्वपूर्ण भेट घेतली. या बैठकीत वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) शांतता आणि स्थैर्य राखण्यावर भर देण्यात आला, तसेच प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षा परिस्थितीवर सखोल चर्चा झाली.
संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, दोन्ही देशांनी पश्चिम आशियातील तणावासह विविध सुरक्षा मुद्द्यांवर आपापले दृष्टिकोन मांडले.
गलवान संघर्षानंतर भारत-चीन संबंधांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. राजनैतिक आणि लष्करी चर्चेनंतर पूर्व लडाखमधील अनेक वादग्रस्त भागांतून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ऑक्टोबर 2024 मध्ये डेपसांग आणि डेमचोक या भागांतूनही सैन्य मागे घेण्याचा करार झाला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग यांनी कझान येथे भेट घेऊन द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर भर दिला होता. तसेच, तियानजिन येथे झालेल्या बैठकीत परस्पर विश्वास आणि सन्मान यावरही दोन्ही देशांनी भर दिला.
दरम्यान, राजनाथ सिंह यांनी रशियाचे संरक्षण मंत्री ऍन्ड्रै बेलोत्सव यांचीही भेट घेतली. या चर्चेत एस-400 मिसाईल सिस्टीमच्या पुरवठ्यासह विविध संरक्षण प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
भारताने 2018 मध्ये रशियासोबत 5 अब्ज डॉलर्सचा करार केला होता, ज्याअंतर्गत काही प्रणाली आधीच प्राप्त झाल्या असून उर्वरित लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे.
याशिवाय, बेलारूसचे संरक्षण मंत्री Viktor Khrenin यांच्यासोबतही राजनाथ सिंह यांनी चर्चा केली. या बैठकीत संरक्षण सहकार्य अधिक बळकट करणे, तसेच प्रशिक्षण आणि तांत्रिक सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला.
राजनाथ सिंह यांनी किर्गिस्तान आणि कझाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांसोबतही स्वतंत्र बैठक घेतल्या. किर्गिस्तानचे संरक्षण मंत्री मुकाम्बेटोव रुस्लान मुस्तफेविच यांच्यासोबत द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या विविध उपायांवर चर्चा करण्यात आली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सोमवारी बिश्केक येथे पोहोचले होते आणि या परिषदेत भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode