बीडच्या मस्साजोग पोटनिवडणुकीत संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव
बीड, 29 एप्रिल (हिं.स.) - सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे रिक्त झालेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. सरपंचपदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना
अ


बीड, 29 एप्रिल (हिं.स.) - सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे रिक्त झालेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. सरपंचपदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना पराभव पत्करावा लागला आहे. प्रतिस्पर्धी स्वरुपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांना ९२ मतांनी पराभूत केले आहे. सरपंच पदासाठी मतदान प्रक्रिया 28 एप्रिलला पार पडली. या निवडणुकीमध्ये 84 टक्के मतदान झाले होते.

विजयानंतर बोलताना स्वरुपानंद देशमुख म्हणाले, मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, माझे मतदार माझ्यासोबत आहेत. त्यांनी मतदानरुपी आशीर्वाद देऊन हे सिद्ध केले आहे. कोणी माझ्यावर काहीही आरोप केले तरी माझी जनता माझ्यासोबत आहे. मी अगोदरही संतोष देशमुखांसाठीच्या न्यायासाठीच्या लढाईत पुढे होतो, इथून पुढेही या लढाईत मी असेन. हा विजय माझ्या तरुण मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे. त्यांनी माझ्यासाठी रात्रीचा दिवस केला, हा माझ्या गावातील जनतेचा आणि स्वाभिमानी मतदारांचा विजय आहे. आगामी काळात गावातील आपली कामं कोण करु शकतो, हे जनतेने लक्षात घेतलं आणि मला मतदान केले.

संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मस्साजोग गावच्या सरपंचपदाची निवडणूक ही बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तसेच देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अश्विनी देशमुख यांच्याविरोधात स्वरूपानंद देशमुख हे रिंगणात उतरल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले होते.

मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या धक्कादायक घटनेमुळे हे सरपंचपद रिक्त झाले होते. संतोष अण्णांच्या निधनामुळे गावात निर्माण झालेली पोकळी आणि त्यांच्या अपूर्ण स्वप्नांचा विचार करून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या एका गटाकडून आणि देशमुख कुटुंबाकडून करण्यात आली होती. यानंतर संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यांना बिनविरोध संधी देऊन संतोष अण्णांना खरी श्रद्धांजली द्यावी, अशी इच्छा व्यक्त करण्यात येत होती.

स्वरूपानंद देशमुख हे मस्साजोग गावातील अनुभवी आणि सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. गावातील स्थानिक प्रश्न, ग्रामपंचायत पातळीवरील विकासकामे आणि सामाजिक संपर्क यामुळे त्यांनी स्वतःचा स्वतंत्र जनाधार तयार केला होता. विशेष म्हणजे ही त्यांची पहिली मोठी राजकीय लढत नव्हती. यापूर्वीही त्यांनी संतोष देशमुख यांच्या विरोधात सरपंचपदाची निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांचा अत्यंत थोड्या फरकाने म्हणजेच अवघ्या ९ मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे यावेळी त्यांनी अधिक ताकदीने मैदानात उतरत विजय मिळवला.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande