ममता बॅनर्जीकडून भवानीपूरमधील मतदान केंद्रांची पाहणी, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
कोलकाता, २९ एप्रिल (हिं.स.) - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान भवानीपूरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. येथे तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत. त्यांनी अनेक मतदान केंद्रांन
ममता बॅनर्जी


कोलकाता, २९ एप्रिल (हिं.स.) - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान भवानीपूरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. येथे तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत. त्यांनी अनेक मतदान केंद्रांना भेट दिली आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.

ममता बॅनर्जी आपल्या कालीघाट येथील निवासस्थानाहून निघाल्या आणि चेतला व पद्मपुकुर रोड परिसरात गेल्या. या दरम्यान, त्यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी अनेक मतदान केंद्रांबाहेर थांबून पाहणी केली. नंतर, त्यांनी चक्रबेरिया भागातील एका मतदान केंद्राचीही पाहणी केली.

ममता बॅनर्जी यांनी मतदान प्रक्रियेदरम्यान बाहेरील निरीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि काही लोक मतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले. त्यांनी निवडणूक आयोगावर पक्षपाताचा आरोपही केला आणि राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या कोणत्याही चर्चेविना केल्या जात असल्याचे सांगितले.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, राज्याबाहेरून अनेक निरीक्षक आले आहेत. ते भाजपच्या आदेशानुसार काम करत आहेत. ते न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत नाहीत. आम्ही न्यायालयाच्या अवमानाची नोटीस पाठवली आहे, तरीही अनेक बाहेरील निरीक्षकांना येथे आणण्यात आले आहे.

त्या म्हणाल्या की, निवडणूक आयोग उघडपणे तृणमूल काँग्रेसचा छळ करत आहे. न्यायालयाच्या आदेशांचे पालन केले जात नाही. त्यांनी असा आरोप केला की, बाहेरील निरीक्षक मतदारांमध्ये भीती आणि घबराट पसरवत आहेत.

विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी मतदान केंद्रांची पाहणी करण्यावरून ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आणि त्या दबावाखाली मैदानात उतरल्या आहेत, असे म्हटले. ते म्हणाले की, नेते दबावाशिवाय अशी पावले उचलत नाहीत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande