पुण्यात तीन अमेरिकन नागरिकांवर धर्मप्रचाराचा आरोप; 10 मेपर्यंत देश सोडण्याचे आदेश
पुणे, 29 एप्रिल (हिं.स.) : पुण्यात टुरिस्ट व्हिसावर आलेल्या तीन अमेरिकन नागरिकांकडून ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, पोलिसांनी त्यांना 10 मेपर्यंत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघे अमेरिकन
प्रतिकात्मक फोटो


पुणे, 29 एप्रिल (हिं.स.) : पुण्यात टुरिस्ट व्हिसावर आलेल्या तीन अमेरिकन नागरिकांकडून ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, पोलिसांनी त्यांना 10 मेपर्यंत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघे अमेरिकन नागरिक काही दिवसांपूर्वी टुरिस्ट व्हिसावर भारतात आले होते. त्यांनी पिंपरी-चिंचवड परिसरातील एका हॉटेलमध्ये 26 एप्रिल रोजी मुक्काम केला होता. त्यानंतर 27 एप्रिल रोजी ते पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरात आले.

या ठिकाणी त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत छापलेली पत्रके स्थानिक नागरिकांना वाटत असल्याचा आरोप आहे. एका ड्रायव्हरला त्यांनी पत्रक देऊन ख्रिश्चन धर्म इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. संशय आल्याने त्या ड्रायव्हरने पोलिसांना याची माहिती दिली.

यानंतर पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन विशेष शाखेत चौकशीसाठी नेले. चौकशीदरम्यान त्यांनी धर्मप्रचार केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

भारतात टुरिस्ट व्हिसावर आलेल्या परदेशी नागरिकांना धर्मप्रचार करण्यास कायद्याने मनाई असल्याचेही पोलिसांनी नमूद केले. तपासात त्यांच्या पासपोर्टवर यापूर्वीही टुरिस्ट आणि बिझनेस व्हिसावर भारत भेटी केल्याची नोंद आढळली आहे.

या प्रकरणानंतर पोलिसांनी तिघांना 10 मेपूर्वी देश सोडण्याचे आदेश दिले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande