
रायगड, 03 एप्रिल (हिं.स.) । मुंबईतील मंत्रालयाच्या शेजारीची सुमारे १५ हजार चौरस फूट शासकीय जागा भाजपला भाडेतत्त्वावर देण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. या निर्णयानुसार १ जानेवारी २०२५ ते १ जानेवारी २०५४ या ३० वर्षांच्या कालावधीसाठी ही जागा देण्यात येणार आहे. या निर्णयावर ऑल इंडिया पॅंथर सेना संतप्त झाली असून सदर निर्णयाचा निषेध नोंदवला आहे.
ऑल इंडिया पॅंथर सेना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार म्हणाले की, राज्यात गॅस व इंधन तुटवडा, वाढती महागाई, रोजगाराचा प्रश्न असे अनेक गंभीर मुद्दे असताना सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून पक्ष कार्यालयासाठी जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, मंत्रालयाच्या परिसरात पक्ष कार्यालय उभारल्यास प्रशासनावर दबाव निर्माण होण्याची शक्यता असून, सामान्य नागरिकांच्या कामकाजावर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशीही भीती व्यक्त करण्यात आली आहे. “हे कार्यालय मंत्रालयाचा पर्याय ठरणार का?” असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
याशिवाय, इतर लहान पक्ष, सामाजिक संघटना व विविध चळवळींना मुंबईत कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिली जात नसताना एका पक्षाला एवढी मोठी जागा देणे अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच संबंधित निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेने केली आहे.-----------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)