
अभिजित तायडेंच्या तक्रारीवर दाखल झाला गुन्हा
अमरावती, ३ एप्रिल (हिं.स.) : चांदूर बाजार पोलीस ठाण्यात अभिजीत दिगंबरराव तायडे (वय ४०, रा. कोल्हा काकडा) यांच्या तक्रारीवरून माजी आमदार बच्चू कडू, शुभम उर्फ गोलू माहोरे आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध अपघाताचा बनाव करून हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडवली आहे.
तक्रारीनुसार, अचलपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे चुलतभाऊ अभिजीत तायडे त्यांच्या जनसंपर्कासाठी विविध कार्यक्रम आयोजित करतात. राजकीयदृष्ट्या आमदार तायडे यांना कमकुवत करण्याच्या उद्देशाने अभिजीत तायडे यांच्यावर अपघात करून हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत नमूद आहे की, डिसेंबर महिन्यात कुरळपूर्णा येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा कट रचण्यात आला. एका गोपनीय साक्षीदाराने त्या संभाषणाची मोबाईलवर रेकॉर्डिंग केली असून, ही पेनड्राईव्ह पोलिसांकडे तक्रारीसह सादर करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव साक्षीदाराचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात काही तथ्य आढळल्याने पोलीसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ५५, ५८ व ६१ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. सदर रेकॉर्डिंगची सत्यता न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासली जाणार असून पुढील तपास चांदूर बाजार पोलीस करीत आहेत.
तक्रारदाराने स्वतःसह आमदार प्रवीण तायडे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका असल्याचे नमूद करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे आणि कायदा भंग करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी