
महावितरणच्या नोटिसांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
रायगड, 03 एप्रिल (हिं.स.) : अलिबाग शहरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) कडून स्मार्ट मीटर बसविण्यासाठी गृह निर्माण सहकारी सोसायट्यांवर दबाव वाढवला जात असल्याचे समोर आले आहे. यासाठी संबंधित सोसायट्यांना अंतिम कायदेशीर नोटिसा बजावण्यास सुरुवात करण्यात आली असून, या नोटिसा सोसायटींच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येत आहेत.
महावितरणकडून देण्यात आलेल्या नोटिसांमध्ये स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, जुन्या मीटरच्या जागी नवीन स्मार्ट मीटर बसविण्यास अडथळा आणल्यास संबंधित सोसायटीचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल. या इशाऱ्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर काही ठिकाणी वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, अनेकांनी या योजनेबाबत आक्षेप नोंदवले आहेत.
यापूर्वीही स्थानिक नेत्यांनी या प्रश्नावर मोर्चे काढत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. मात्र, या चर्चांनंतरही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नाही. ग्राहकांकडून वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
याशिवाय, अलिबाग परिसरातील अनेक हाउसिंग सोसायट्या सध्या पुनर्विकास प्रक्रियेत आहेत किंवा त्या प्रक्रियेत जाण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीतही स्मार्ट मीटर बसविणे बंधनकारक असल्याचे सांगितले जात असल्याने सोसायटी पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर नागरिकांनी प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी आणि जबरदस्तीऐवजी संवादातून तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)