
रायगड, 03 एप्रिल (हिं.स.)।
श्रीवर्धन शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून “चोर मोकाट, पोलीस कुठे?” असा संतप्त सवाल येथील महिला मंडळाने उपस्थित केला आहे. शहरातील विविध भागांत संशयितांचा वाढता वावर आणि घरफोड्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिला मंडळाने श्रीवर्धन पोलीस ठाण्याकडे निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
नगरपरिषद हद्दीतील गुरवआळी, पोतदारचाळ, धोंडगल्ली व साळीवाडा या भागांत गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. सुमारे १५ दिवसांपूर्वी तालुक्यात तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडून दागिने व रोख रक्कम लंपास करण्यात आली होती. या प्रकरणांची नोंद पोलीस ठाण्यात झाली असली, तरी अद्याप गुन्ह्यांचा उलगडा झालेला नाही, यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात गुरवआळी परिसरात मध्यरात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास एका संशयित इसमाला हातात लोखंडी सळी घेऊन फिरताना काही नागरिकांनी पाहिले. तसेच दि. १ एप्रिल रोजी रात्री उशिरा २ ते ४ इसम चेहऱ्यावर मास्क लावून फिरताना दिसून आल्याने भीतीचे वातावरण अधिकच तीव्र झाले आहे. काही ठिकाणी घरांच्या दरवाजांवर ठोके मारण्याचे प्रकारही घडत असल्याची माहिती महिलांनी दिली.
या घटनांमुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून अनेकांनी रात्री सतर्क राहण्यास सुरुवात केली आहे. महिला मंडळाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितांचा शोध घ्यावा, गस्त वाढवावी व दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
“वेळेत कारवाई न झाल्यास गंभीर घटना घडण्याची शक्यता आहे,” असा इशारा देत परिसर भयमुक्त करण्याची मागणी महिलांनी केली. यावेळी नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते संतोष (पिंट्या) वेश्विकर यांच्यासह सुमारे ५० ते ६० महिला उपस्थित होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)