
नागपूरच्या सदर पोलिसात दाखल करण्यात आला गुन्हा
नागपूर, 30 एप्रिल (हिं.स.) : नागपूरच्या महाल परिसरताली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि रेशीबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा करणारे एक निनावी पत्र पोलिस आयुक्तांना पाठवण्यात आले. याप्रकरणी स्थानिक सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
इंग्रजी भाषेतील या पत्रात नमूद केल्यानुसार नागपुरातील संघ मुख्यालय आणि रेशीमबाग कार्यालयात तसेच नागपूर मेट्रोच्या ऑरेंज व ऍक्वा लाईन गाड्यांमध्ये त्याप्रमाणे बसेसमध्ये
‘सिझीयम-137’ नामक रेडिओऍक्टीव्ह पावडर टाकण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या पदार्थामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते व नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, अशी धमकी पत्रात देण्यात आली आहे. यासोबतच संबंधित पावडर कॅन्सर रुग्णालयातून मिळाल्याचे सांगण्यात आले असून, संपूर्ण नागपूर शहर ‘रेडिएशन’च्या धोक्यात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील तज्ज्ञांकडून तपासणी केल्यास याची सत्यता स्पष्ट होईल असा दावा देखील पत्रात करण्यात आला आहे.
या पत्राची गांभीर्याने दखल घेत तातडीने अँटी टेररिझम स्क्वॉड (एटीएस) पथक घटनास्थळी दाखल झाले. संघ मुख्यालय, रेशीमबाग स्मृतिमंदिर, गणेशपेठ येथील भाजप कार्यालय तसेच विविध मेट्रो स्थानकांवर एनडीआरएफ व अणुऊर्जा तज्ज्ञांच्या मदतीने सखोल तपासणी करण्यात आली. मात्र, या तपासात कुठेही कोणताही रेडिओॲक्टिव्ह पदार्थ आढळून आलेला नाही. याच पत्रात काही दिवसांपूर्वी दोरसभवन मेट्रो स्थानकाजवळ सापडलेल्या डेटोनेटर्स व जिलेटिन कांड्यांबाबतही दावा करण्यात आला असून, तो केवळ इशारा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, शहरातील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी एटीएसच्या तक्रारीवरून सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे पत्र खोडसाळपणातून पाठविण्यात आले आहे की त्यामागे काही गंभीर कट आहे, याचा सखोल तपास सुरू आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी