
नवी दिल्ली , 30 एप्रिल (हिं.स.)।दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या सुमारे ३० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेबाबत सुरू असलेल्या वादाच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या मुलांच्या बाजूने अंतरिम दिलासा दिला आहे.
न्यायालयाने संजय कपूर यांच्या पत्नी प्रिया कपूर यांना त्यांच्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्यापासून रोखले आहे. तसेच, करिश्मा कपूर यांच्या मुलांनी दाखल केलेला दावा प्रलंबित असताना संबंधित मालमत्ता सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. करिश्मा कपूर यांच्या मुलांनी संजय कपूर यांच्या मृत्युपत्राच्या प्रामाणिकतेला आव्हान दिले होते. न्यायालयाने नमूद केले की मृत्युपत्राची सत्यता हा खटल्यातील (ट्रायलमधील) विषय आहे आणि तोपर्यंत मृत्युपत्रकर्त्याची (संजय कपूर यांची) मालमत्ता सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.
न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या खंडपीठाने प्रिया कपूर यांना भारतीय कंपन्यांमधील इक्विटी किंवा शेअरहोल्डिंग विकणे, हस्तांतरित करणे, गहाण ठेवणे किंवा त्यात बदल करण्यास मनाई केली आहे. तसेच, वैयक्तिक वस्तू, कलाकृती इत्यादी विकण्यासही त्यांना प्रतिबंध घालण्यात आला असून यासाठी त्यांनीही सहमती दर्शवली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode