यापुढे पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होऊ देणार नाही - सुप्रिया सुळे
मुंबई, 30 एप्रिल (हिं.स.) - महाराष्ट्रात 2024 मध्ये पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबातीलच दोन सदस्य एकमेकांच्या विरोधात लढले होते. लोकसभेची निवडणूक जास्त चुरशीची ठरली होती. पण आता यापुढे पवार विरुद्ध पवार निवडणूक होऊ देणार नाह
सुप्रिया सुळे


मुंबई, 30 एप्रिल (हिं.स.) - महाराष्ट्रात 2024 मध्ये पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबातीलच दोन सदस्य एकमेकांच्या विरोधात लढले होते. लोकसभेची निवडणूक जास्त चुरशीची ठरली होती. पण आता यापुढे पवार विरुद्ध पवार निवडणूक होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केली. त्या मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, बारामतीत गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांची जी नातवंड आहेत, पवार आडनावाची आहेत यांच्या विरोधात मी कधीही इलेक्शन लढणार नाही. दुसरा मतदार संघ बघेन, मला देशाची सेवा करायची आहे, जर दुसऱ्या कोणाची इच्छा असेल, तर मी दुसऱ्या मतदारसंघात काम करेन. हेही इलेक्शन मी लढले नव्हते, याही इलेक्शनचा खूपसा इतिहास आहे. जो आज सांगणं गरजेचं वाटत नाही. मागच्या वेळेस देखील तयारी आणि इच्छा बिलकुल नव्हती इथून पुढेही नसणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

विधान परिषदेच्या निमित्तानं महाविकास आघाडीत झालेल्या घडामोडी आणि त्यासंदर्भात झालेलं राजकारण बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडी एका विश्वासाच्या प्रेमाच्या नात्यानं संविधान वाचवण्यासाठी एकत्रित आलेली आहे. समंजस पद्धतीने तिन्ही पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या हितासाठी काम करत आहेत, त्यामुळे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात त्यापेक्षा जास्त काही नाही. माझं काल रात्रीच उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं होतं, उद्धव ठाकरे यांचा काल शरद पवार यांना फोन आला होता. जयंत पाटील यांच्याशी देखील बोलणं झालं होतं आणि कालच आम्हाला हे कळलं होतं. मीही काल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलले होते. आता एका मताने महाविकास आघाडीच्या वतीने अंबादास दानवे विधान परिषदेवर जात आहेत. खरंतर शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा चालली होती. हर्षवर्धन सपकाळ सविस्तर बोलले आहेत. आता वेगळं काय बोलायची गरज वाटत नाही. मी असं काही बघत नाही, पवार साहेबांची देखील बिनविरोध निवडणूक झाली. भारतीय जनता पक्षाने बिनविरोध का दिला? शिंदेंच्या शिवसेनेने बिनविरोध का दिला? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

कुठल्याही कुटुंबाचा कर्ता पुरुष, व्यक्ती जेव्हा अचानकपणे जाते, ज्या भावना प्रत्येक घरात असतात, ते अर्थातच आमच्या घरात आहेत. एक फरक जाणवतो, आपण बाहेर जावून त्या भावना दाखवत नाहीत. आमच्या वडिलांची सर्वात मोठी खासियत आहे की, ते घरात आणि घराबाहेर सारखंच वागतात. ते कधीही स्वत:च्या भावना फारशा कुणाला दाखवत नाहीत आणि ते खूप कमी बोलतात. त्यामुळे त्यांच्या मनात काय चाललं आहे हे फार कमी लोकांना जाणवत असतं. जबाबदाऱ्या प्रत्येक असतात. अनेक कुटुंब आहेत ज्यांच्यावर असे प्रसंग आलेले आहेत आणि ताकदीने उभे राहून लोकांनी आपापल्या जबाबदाऱ्या पाळलेल्या आहेत. त्यामुळे नवीन कौतुक असं नाही. हा अडचणीचा, संघर्षाचा काळ सगळ्यांसाठी आहे. आता आपली वेळ आहे.

विलीनीकरणाचा विषय हा अजित दादांच्या मनात होता. आता अजित दादा नाही राहिले तर विषय राहिला कुठे? आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. अजित दादा माझा मोठा भाऊ आणि माझा नेतादेखील होता. अजित दादांना नेता आणि मोठा भाऊ हा सन्मान कालही दिला आणि उद्याही देणार आहे. दादा गेल्यानंतर खूप गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे दादासोबतचे ते गोड नातं संपलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक जणाने आपल्या संघटनेत काय करायचं हा प्रत्येकाला सशक्त लोकशाहीत अधिकार आहे. प्रत्येकाने आपापले काम करावं. एवढीच अपेक्षा आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

जी लढाई टीव्ही वरती चालते ते कुठल्याही सुसंस्कृत घरात होऊ नये अशी माझी प्रांजळ इच्छा आहे. फार कष्टाने पवार कुटुंबावर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या लोकांनी जो विश्वास दाखवला आहे. संघटनेमध्ये अनेक कार्यकर्ते असतात जे आपल्या नेत्यावर विश्वास ठेवून काम करत असतात. त्यामुळे कोणाचंही नुकसान होऊ नये यासाठी मी हे पाऊल टाकलेलं आहे.

बच्चू कडूंसदर्भात विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तेव्हा त्यांनी ही लोकशाही आहे, प्रत्येकाच्या पक्षांमध्ये त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणी कोणाला तिकीट द्यायचा हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मी जास्त विचार करत नाही मी आजचा दिवस जगत आहे, उद्याचा दिवस कोणी पाहिला आहे.

अजित पवारांच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे. ते स्वतः जातीने लक्ष घालून चौकशी पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करतील, आपण त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवूया असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande