
सायप्रस, 05 एप्रिल (हिं.स.)सायप्रसमध्ये सुरू असलेल्या फिडे कॅन्डिडेट्स २०२६ च्या सहाव्या फेरीत जावोखिर सिंदारोव्हने चीनच्या वेई यीवर मात केली. सिंदारोव्ह आता सहा सामन्यांमधून ५.५ गुणांसह गुणतालिकेत आघाडीवर आहे. सामन्याच्या सुरुवातीला, सिंदारोव्हने प्याद्यांची कमकुवत रचना स्वीकारली, पण लवकरच त्याने खेळात गती आणली. वेईने दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण सिंदारोव्हने त्याला जोरादार प्रत्युत्तर दिले. ज्यामुळे त्याच्याकडे कोणताही प्रतिहल्ला शिल्लक राहिला नाही आणि त्याला हार मानणे भाग पडले.
भारताच्या महिला ग्रँडमास्टर्ससाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. कारण दिव्या देशमुख आणि आर. वैशाली यांनी आपापले पहिले विजय नोंदवले.ज्यामुळे वैशाली गुणतालिकेत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
बिबिसाराच्या Qd2 आणि Re1 या चाली खूपच निष्क्रिय होत्या, तिला अधिक आक्रमक प्रतिहल्ल्याची गरज होती. दिव्याने याचा फायदा उचलत, ४६ व्या चालीला Qf4 ही चाल खेळली. तिने सातत्याने प्रतिस्पर्ध्याच्या राजाला लक्ष्य केले, आपल्या प्रत्येक मोहऱ्याची स्थिती सुधारली आणि पांढऱ्या बाजूची स्थिती पूर्णपणे कोलमडून टाकली, ज्यामुळे तिला विजय मिळवता आला. दरम्यान, अॅना मुझीचुकने झू जिनरचा पराभव करत महिला गटातील आपले अव्वल स्थान आणि आघाडी कायम राखली आहे.
आर. प्रज्ञानंदने हिकारू नाकामुराशी बरोबरी साधली. नाकामुराने 'क्वीन्स पॉन ओपनिंग'ची निवड केली, ज्याला प्रज्ञानंदने आपल्या मोहर्यांच्या भक्कम मांडणीद्वारे समर्थपणे प्रत्युत्तर दिले. दोन्ही खेळाडूंनी खेळाच्या सुरुवातीचा टप्पा अत्यंत वेगाने खेळून काढला, ज्यातून त्यांची सखोल तयारी दिसून आली. पण दोघांपैकी कोणालाही निर्णायक आघाडी घेता आली नाही आणि अखेर हा सामना बरोबरीत सुटला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे