
नागपुरात भाजपचा स्थापना दिवस सोहळा उत्साहात
नागपूर, 06 एप्रिल (हिं.स.) : सेक्युलर शब्दाचा अर्थ सरसकटपणे धर्मनिरपेक्ष असा घेतला जातो. परंतु, सेक्युर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष नसून सर्वधर्म समभाव असा आहे. तसेच भाजप सर्वधर्म समभाव या सूत्रावर चालत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरात आज, सोमवारी पक्षाच्या स्थापनादिन समारंभात उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
याप्रसंगी गडकरी म्हणाले की, भाजपच्या संदर्भात हा एका विशिष्ठ जातीचा पक्ष आहे, हो लोक महात्मा गांधींचे मारेकरी आहेत, मुसलमानांच्या विरोधात आहे असा अपप्रचार केला जातो. भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. आणि भारतीयत्व व राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व आहे. हिंदु ही जीवन पद्धती आहे. सेक्युलरचा अर्थ धर्मनिरपेक्षता असा सांगितला जातो. पण, सेक्युलरचा अर्थ सर्वधर्मसमभाव' असा असून भाजप त्याच सूत्रावर मार्गक्रमण करीत असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. आमचा वारसा, संस्कृती व इतिहास एकच आहे. काश्मीर हो या गोहाटी, अपना देश, अपनी माटी' हाच आमचा नारा आहे. अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मी राजकारणात नवीन होतो. एकदा त्यांनी मला बोलावून घेतले. आणि स्वतःची माहिती देताना सांगितले की, ते कोकणस्थ ब्राम्हण असून त्यांचे मूळ आडनाव करंदीकर आहे.
सरकार वा राजा सेक्युलर असला पाहिजे. पण, व्यक्ती कधी धर्मनिरपेक्ष असू शकत नाही. जर माणूस खरोखर धर्मनिरपेक्ष असता तर इंदिरा गांधी व राजीव गांधींच्या मृत्यूनंतर ब्राम्हणांना बोलावून मंत्राग्नी देण्यात आला नसता. गांधी कुटुंबिय जर सेक्युलर होते तर ब्राम्हणांना का बोलावले? मंत्राग्नी का दिला? का त्यांचा विधी करण्यात आला? कारण ते ज्या धर्माशी जोडले होते. त्यांनी त्याचा स्वीकार केला होता. म्हणून सर्वधर्मसमभाव हाच सेक्युलर शब्दाचा अर्थ असल्याचे गडकरी यांनी अधोरेखित केले.
कार्यकर्त्यांनी खुर्चीचा मोह सोडावा याबाबत आवाहन करताना गडकरी म्हणाले की, खूर्चीवर बसलेला एकदिवस उठणारच आहे. त्याला उठावेच लागणार आहे. नाही उठला तर देव उठवून घेऊन जाईल. याला कोणी अपवाद नाही. पद, सत्ता तात्कालिक आहे. खूर्ची मिळाल्यावर शांततेने राहा, अंगात येऊ देवू नका. खूर्ची कधीही जाऊ शकते. पोलिसही तुम्हाला सोडून जातात. ते कधीही सोडून जावू शकतात हितोपदेश गडकरी यांनी दिला. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या पिढ्या बदलत राहातात. नेतृत्व बदललेही पाहिजे. याचा अर्थ नेत्याच्या पोटातून नेता जन्माला आला पाहिजे असे नाही. कार्यकर्त्यामधून नेतृत्व विकसित झाले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
पाकिस्ताने अडवले होते विमान
इराण अमेरिकेचे युद्ध सुरू आहे. मी जहाजबांधणी मंत्री असताना इराणमध्ये चाबहार बंदर बांधण्याचे भाग्य मिळाले. मी सात आठ वेळा इराणला जाऊन आलो. इराणला मी संरक्षण विभागाच्या विशेष विमानाने जात असे. एकदा पाकिस्तानने मध्येच माझे विमान थांबवून पुढे जाता येणार नाही असे सांगितले. त्यावेळी तिथून परत येऊन गुजरातमार्गे चाबहारला गेलो होतो.
खोमेनी मूळचे लखनऊचे
अफगाणीस्तान, इराण, पाकिस्तान, उझबेकीस्तान या देशांसह सिंधु नदीच्या पुढे विकसित झालेल्या संस्कृतीशी आमचे नाते होते. मी अयातुल्ला खोमेनी यांची त्यांच्या घरी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मला पर्शियन भाषा कुठून आली हे विचारले. संस्कृत आमची मूळ भाषा असून पर्शियन भाषेचा उद्धव संस्कृतमधून झाल्याचे खोमेनी यांनी सांगितले होते. इराणमधील तेहरान विद्यापीठात संस्कृत विभाग आहे. माझे मूळ लखनऊ जवळील एका गावात असल्याचे खोमेनी यांनी सांगितले होते.
कुप्रथांमुंळे हिंदु धर्माचे नुकसान
जुन्या काळी हिंदु धर्मात चुकीच्या प्रथा होत्या.कोंबडी खाल्ल्यानंतर तिचे बाकीचे अवयव एखाद्याच्या घरी टाकला वा समुद्र सफारीवर गेला तर त्याला हिंदू धर्मातून बहिष्कृत केल्या जात होते. त्यावेळचे काही पंडित व ब्राम्हणांनी चुकीच्या प्रथांमुंळे हिंदु धर्माचे खुप नुकसान केल्याचे गडकरी म्हणाले. अस्पृश्यता, जातीयता कुठेच नव्हती आणि आहे. जात, पंथ, धर्म भाषेने नव्हे तर गुणाने माणूस मोठा होतो असे मानणारे आम्ही आहो.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी